⚡मालवण ता.०३-:
कोकणातील ज्येष्ठ लेखक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांच्या जीवन व कार्याला उजाळा देण्यासाठी येथील बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण व साहित्य अकादमी दिल्ली यांच्यावतीने दि. १७ ऑगस्ट रोजी सेवांगण, मालवण येथे जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, ॲड. संदीप निंबाळकर, शैलेश खांडाळेकर, प्रवीण बांदेकर, महेश केळुसकर, ज्योती तोरसकर, सुधाकर मातोंडकर आदी उपस्थित होते.
श्री. बांदेकर म्हणाले, हे वर्ष कोकणातील ज्येष्ठ लेखक कै. जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आरवली वेंगुर्ले या गावचे सुपुत्र असलेले जयवंत दळवी हे मराठी साहित्यात कथा, कादंबरी, नाटक, विनोदी लेखन अशा विविध अंगी लेखन प्रकारातून मौलिक भर घालणारे चतुरस्त्र साहित्यिक होते. मानवी मनाचा तह शोधू पाहणारे त्यांचे साहित्य आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे. जयवंत दळवी यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला राष्ट्र सेवादलातही काम केले होते. प्रभात, लोकमान्य दैनिकांमधून त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या लेखनाचा प्रारंभ केला होता. याशिवाय परकीय भाषातील उत्तमोत्तम साहित्य कृती मराठी वाचकांना परिचित व्हाव्यात यासाठी युसेस अमेरिकन माहिती केंद्राच्या माध्यमातून अनेक विदेशी साहित्यकृतीच्या भाषांतरासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या जीवन व कार्याला उजाळा देण्याच्या हेतूनेच हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राला साहित्य अकादमीचे सहकार्य लाभले आहे, असेही ते म्हणाले.
बॅ नाथ पै सेवांगण ही समाजवादी विचारांची संस्था साहित्यिक, सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवीत असते. अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजभान निर्माण करणे, वैचारिक जाणीवा समृद्ध करणे व लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे हा उद्देश यामागे कायम असतो. या चर्चासत्राचे आयोजनही नव्या पिढीमध्ये आपल्या भूमीतील एका ज्येष्ठ लेखकाच्या कार्यकर्तृत्वाविषयी जागृती व्हावी, लिहिणाऱ्या नव्या लोकांना प्रेरणा मिळावी या हेतूने करण्यात आले आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले व नि:शुल्क आहे, असेही श्री. बांदेकर यांनी स्पष्ट केले.
दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. चर्चासत्रात साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील, सचिव के. श्रीनिवासराव, बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, जयवंत दळवी यांचे पुत्र गिरीश दळवी, साहित्य अकादमी विभागीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रात प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचे बीज भाषण होणार आहे. पहिल्या सत्रात महेश केळुसकर हे जयवंत दळवींचे व्यक्तित्व आणि साहित्यनिष्ठा, शरयू असोलकर या दळवींच्या साहित्यातील कोकण, संजय कळमकर हे दळवींच्या कादंबऱ्या, गोविंद काजरेकर हे दळवींचे कथा साहित्य यावर बोलणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रेमानंद गज्वी हे जयवंत दळवींचे नाटक, वामन पंडित हे हास्य लेखन, श्रीकांत बोजेवार हे चित्रपटातील योगदान यावर बोलणार आहेत. या चर्चासत्राच्या निमित्ताने साहित्य अकादमीच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री ही आयोजित करण्यात आली आहे तरी शाळा महाविद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षक प्राध्यापकांनी साहित्यप्रेमींनी या चर्चासत्रास उपस्थित राहावे, असे आवाहनही सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी यावेळी केले.