भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदनद्वारे केली मागणी:लोकांची होणारी गैरसोय टाळावी..
⚡बांदा ता.३१-: गणेशोत्सव कालावधीत शासनमान्य रास्त धान्य दुकानात धान्य पुरवठा वेळेत वितरित करावा तसेच ग्राहकांची संख्या लक्षात घेता एखादेवेळेस नेटवर्क समस्या निर्माण झाल्यास आपल्या स्तरावर धान्य वितरणाची योग्य ती कार्यवाही करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी आज बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी निवेदन देखील दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी सण हा तोंडावर आला आहे. त्यामुळे रेशन दुकानावर ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे धान्याचे वितरण हे मागणीनुसार व योग्य वेळेत व्हावे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क समस्यामुळे धान्य वितरित करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. यातून वितरण प्रतिनिधी व ग्राहकांत वादाचे प्रकार देखील उद्भवतात. यामुळे या समस्यांचे आपल्या स्तरावर निराकरण करून लोकांची गैरसोय टाळावी.
यावेळी बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, नागेश सावंत आदी उपस्थित होते.
फोटो:-
सावंतवाडी येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना बांदा भाजपचे पदाधिकारी.