⚡मालवण ता.१२-:
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या समुद्रात साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याने मालवण बंदर जेटी येथे शिवप्रेमीनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने आयोजित या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने ढोल ताशांचा गजर करीत, गुलाल उधळीत, फटाक्यांची आतषबाजी आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. यामध्ये शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारा आणि गेली साडेतीनशे वर्षे समुद्राच्या लाटा, वारा पाऊस आणि तुफानांचा सामना करत अभेद्य उभा असलेल्या व वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याने मालवणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजऱ्या केलेल्या या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज कि जय… जय भवानी जय शिवाजी… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय… हरहर महादेव… अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर शिवप्रार्थना झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, भाजप नेते अतुल काळसेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरसकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, शिल्पा खोत, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, यतीन खोत, आबा हडकर, ललित चव्हाण, गणेश कुशे, दादा वेंगुर्लेकर, सुर्यकांत फणसेकर, अन्वेषा आचरेकर, पूजा सरकारे, रविकिरण तोरसकर, प्रमोद करलकर, रत्नाकर कोळंबकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, भालचंद्र राऊत, महेश मांजरेकर, दादा वाघ, दाजी सावजी, आर. एन. काटकर, विशाल ओटवणेकर, हितेश वायंगणकर, मंडळ अधिकारी पीटर लोबो, तलाठी श्री. राठोड, बंदर विभागाचे श्री. कदम व इतर उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याने प्रशासनाला वं सिंधुदुर्गवासियांना भरपूर आनंद झाला आहे, आपल्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे दोन किल्ले यामध्ये समाविष्ट झाले असल्याने याचा विशेष आनंद आहे, असेही ते म्हणाले. गुरुनाथ राणे यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे. गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आहे, असे सांगितले.
यावेळी अतुल काळसेकर म्हणाले, मालवणात नौदल दिन साजरा झाला, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. त्यानंतर या सर्व प्रक्रियेला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग किल्ला जागतिक नकाशावर आला आणि युनेस्कोने सिंधुदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करून त्यावर शिक्कामोर्तब केले, हि गोष्ट भूषणावह आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरसकर यांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यामध्ये दुर्ग, भुईकोट, गडकोट असे तिन्ही प्रकारचे किल्ले असून हे किल्ले युनेस्कोच्या ताब्यात गेल्याने या किल्ल्यांचे अपेक्षित असे संवर्धन व जतन होणार आहे, असे सांगितले. तर शिल्पा खोत यांनी आजच्या दिवसाचा आनंद गगनात मावेनासा आहे, शिवरायांनी उभारलेले किल्ले आजही उभे असून ते पुढेही अखंडित उभे राहोत, असे सांगितले.