तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता बाबत कुडाळ कोर्टाचा उपक्रम:दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी यांचे मार्गदर्शन..
⚡कुडाळ ता.०६-: दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रमासाठी न्याय जागृती २०२५ या अंतर्गत कुडाळ तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा प्रसार पोलीस पाटील यांच्या मार्फत करून जनजागृती केली जाणार आहे. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये अलीकडेच हे शिबीर संपन्न झाले.
दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तहसील कार्यालय कुडाळ यांच्या वतीने येथील मराठा समाज हॉलमध्ये पोलीस पाटील कुडाळ यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तळागाळातील पातळीवरील लोकांना त्यांचे कायदेशीर हक्क समजून घेण्यास आणि कायदेशीर सेवांचा लाभ मिळण्याकरिता असणाऱ्या योजनांची माहिती या शिबिरात देण्यात आली. कुडाळ तालुका विधी सेवा जागृती कमिटीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क स्तर) कुडाळ माननीय जी ए कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिराला जागृती कमिटीचे सदस्य कुडाळ तहसीलदार व्ही जी वसावे, पोलीस निरीक्षक आर ए मगदूम, वकील आर डी बिले, वकील एस एस कुलकर्णी व विधी स्वयंसेवक उपस्थित होते.
माननीय दिवाणी न्यायाधीश कुडाळ जी ए कुलकर्णी साहेब यांनी जागृती तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रमासाठी न्याय जागृती योजना 2025 याबाबत माहिती देऊन पोलीस पाटील यांचे मार्फत सदरहू माहितीचा प्रसार करण्याचे आवाहन केले. वकील आर डी बिले यांनी मध्यस्थी या विषयावर मार्गदर्शन करून मध्यस्थी करून वाद मिटवता येतात असे सांगितले. तसेच वकील एस एस कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमात 120 ते 125 पोलीस पाटील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था वरिष्ठ लिपिक आर टी आरेकर व चपराशी जे के चव्हाण याने पाहिली.