⚡कणकवली ता.०५-: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे नंबर १ येथे शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आणि भक्तीगीत गायनाची स्पर्धा पार पडली. यावेळी पालक, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी, तसेच अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
पारंपारिक कला कौशल्य यांची जोपासना आणि वारकरी दिंडीचे महत्व या विषयी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामदैवत रवळनाथ मंदिरामध्ये वारकरी दिंडीचे गोल रिंगण करण्यात आले. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सर्व विद्यार्थी तल्लीन होऊन नाचत होते. मुलांनी विठ्ठल नामाचा गजर करत टाळ मृदुंगाचा जयघोष केला. प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी यांचा पारंपारिक वेश मुलानी परिधान केला होता. भक्तीगीत गायनाची स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. दुसरी ते तिसरीच्या गटामध्ये प्रथम युक्ता घाडीगावकर, द्वितीय पार्थ साटम, तृतीय प्रणव देसाई, उत्तेजनार्थ प्रेरणा मेस्त्री यांनी नंबर पटकावले तर चौथी ते पाचवी या गटामध्ये प्रथम स्वयम वावळीये, द्वितीय वेदिका मेस्त्री, तृतीय लावण्या घाडीगावकर आणि उत्तेजनार्थ निधी सातवसे यांचे क्रमांक आले, सहावी ते सातवीच्या तिसऱ्या गटामध्ये प्रथम प्रगती नादीवडेकर, द्वितीय समीक्षा कदम, तृतीय तेजाली मेस्त्री आणि उत्तेजनार्थ पूर्वा बरगे यांनी यश मिळविले. या कार्यक्रमासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून विभा विजय राणे, कविता बुचडे, आर्कान म्हापसेकर यांनी काम पाहिले. मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. प्रकाश पवार यांनी सर्वांचे आभार मानले.