उद्यापासून दुरुस्तीची कामे सुरू होणार: सरपंच गुणाजी गावडे यांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष..
⚡सावंतवाडी ता.०२-: पावसाळा सुरू झाल्यापासून वेत्ये गावातील वीजपुरवठ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) उपअभियंता कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली. सरपंच श्री. गुणाजी गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपअभियंत्यांशी चर्चा करत गावातील वीज समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले.
या भेटीदरम्यान, उपअभियंत्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे की, उद्यापासून (०३/०७/२०२५) वेत्ये गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कामे हाती घेण्यात येतील. यामध्ये खराब झालेले विजेचे खांब बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे आणि तुटलेल्या तारा बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. तसेच, विजेच्या लाईनवरील झाडांची छाटणी करून स्वच्छता केली जाईल, ज्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र आंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. गुरुदास गांवकर, श्री. नरेंद्र मिठबावकर, श्री. जितेंद्र गांवकर, श्री. पुंडलिक देऊलकर, श्री. अंतोन फर्नांडिस, श्री. शेखर खांबल, श्री. बाबू देऊळकर, श्री. सत्यवान गावडे, श्री. भूषण पाटकर, श्री. राम पेडणेकर, श्री. संदीप गावडे, श्री. अंकुश गावडे आणि श्री. अनंत गोठसकर हे ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे वेत्ये गावातील वीज समस्या लवकरच दूर होण्याची अपेक्षा आहे.