महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची वीज कार्यालयावर धडक..
⚡मालवण ता.२५-:
मालवण शहरातील मेढा राजकोट भगता गेले दोन महिने स्ट्रीट लाईट बंद असून यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटन व्यावसायिक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत असल्याबाबत आज मेढा राजकोट भागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज कार्यालयावर धडक देत अभियंत्यांना जाब विचारला. बंद स्ट्रीट लाईटबाबत वीज वितरण कंपनीचे वारंवार लक्ष वेधून देखील स्ट्रीट लाईट सुरु करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याची तीव्र नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. यावर मालवणचे उपअभियंता सचिन म्हेत्रे यांनी येत्या आठवड्याभरात मेढा राजकोट परिसरातील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत आज दुपारी या भागातील नागरिकांनी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण वीज कार्यालयात जाऊन उपअभियंता सचिन म्हेत्रे यांचे लक्ष वेधत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जावकर यांच्या समवेत यावेळी बंड्या सरमळकर, उमेश परब, रुजाय फर्नांडिस, महेश केळूसकर, सतीश सरमळकर, निलेश सावंत, संजय टेमकर, सागर पाटकर, रुपेश पाटकर, सुनील शिरोडकर, लुईस फर्नांडिस, राजाराम पारकर, यश पारकर, रघुनाथ केळूसकर, प्रसाद सकपाळ, भाग्यश्री लाकडे- खान, तेजस कांदळकर आदी उपस्थित होते.
मेढा राजकोट परिसरात रॉक गार्डन, जय गणेश मंदिर, राजकोट किल्ला व शिवरायांचा पुतळा अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे याभागात नागरिक व पर्यटक यांची मोठी वर्दळ असते. मात्र रात्रीच्या वेळी याभागातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यांवर काळोख असल्याने पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते. गेले दोन महिने स्ट्रीट लाईट बंद आहेत. सध्या पावसाळ्यात रात्रीच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरून काळोखात ये – जा करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. याबाबत वीज वितरण कार्यालयात तक्रारी देऊनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तक्रार दिल्यावर लाईन फॉल्ट आहे एवढेच सांगितले जाते. तसेच अनेकदा तक्रार करण्यासाठी असलेल्या फोन नंबर वर कॉल केला असता फोन उचलला जात नाही. वायरमनही व्यवस्थित काम करत नाहीत, त्यांच्या कामावर अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, स्ट्रीट लाईट चालू- बंद करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही अशा तक्रारी यावेळी महेश जावकर यांच्यासह नागरिकांनी मांडल्या. मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट लवकरात कराव्यात तसेच रोझरी चर्च ते रॉक गार्डन ते जय गणेश मंदिर पर्यंतच्या स्ट्रीट लाईट तात्पुरती मलमपट्टी न करता व्यवस्थित दुरुस्त करून कायमस्वरूपी कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
यावर उप अभियंता सचिन म्हेत्रे म्हणाले, साध्या पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होत असल्याने वीज लाईन दुरुस्तीच्या कामात वीज कर्मचारी अडकले आहेत. यामध्ये शहरातील स्ट्रीट लाईटकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे आम्ही मान्य करतो. मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईटची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करून येत्या आठवडाभरात स्ट्रीट लाईट सुरु करण्यात येतील असे आश्वासन श्री. म्हेत्रे यांनी दिले. तसेच तक्रारीसाठी कार्यालयातील फोन उचलला जाईल याबाबत योग्य ती काळजी घेऊ. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट चालू व बंद करण्याची कायदेशीर जबाबदारी नगरपालिकेची असून याबाबत यापूर्वीच नगरपालिकेला पत्र देण्या आले आहे, तरीही याबाबत पुन्हा बैठक घेऊन योग्य टो मार्ग काढण्यात येईल, असेही श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.