आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्याना शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य…

जिल्हाधिकारी अनिल पाटील:सिंधुदुर्गनगरी येथे आणीबाणी बंदीवानांचा सन्मानपत्र देवून करण्यात आला सत्कार..

ओरोस ता २५
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. त्याला आज ५० वर्षे होत आहेत. संविधान आणि स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला. या काळात तुरुंगवास भोगलेल्याना शासनाने सुरू केलेल्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. ज्यांना यांचा लाभ मिळालेला नाही परंतु त्याचे पुरावे आहेत. त्यांचे प्रस्ताव सादर केले जातील. तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासन सर्व सहकार्य करील, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी बुधवारी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आणीबाणीला ५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्ती व कुटुंबीय यांचा सत्कार तसेच चित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई, शारदा पोवार, लवू म्हाडेश्र्वर, आणीबाणी शिक्षा भोगलेल्यांचे नेते गजानन पणशीकर आदी उपस्थित होते.
यावेळी चित्र व माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. हा चित्र व माहिती प्रदर्शनाचा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. प्रत्येकी तालुक्यात यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सन्मानपत्र देवून आणीबाणी शिक्षा भोगलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी पाटील यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना आणीबाणीचे जिल्ह्याचे नेते पणशीकर यांनी, आणीबाणी काळात आम्ही तुरुंगवास भोगला. जेलर कडून अत्याचार सहन केले. आम्ही जेलमध्ये असलोतरी बाहेर असलेल्या व्यक्ती दडपणाखाली वावरत होत्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ते पुन्हा उभे राहू शकले नाहीत. आम्हाला मिळणारे जेवण निकृष्ट होते. १३० एकूण कुटुंबे होती. त्यातील १०६ व्यक्ती हयात आहेत, असे सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी आणीबाणीत नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात काम करायला मिळत आहे, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश पवार यांनी केले. याबाबत समाधान व्यक्त केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी मानले.

You cannot copy content of this page