लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांचे उपरकर यांना आश्वासन.
कणकवली : लघुपाटबंधारे विभागाच्या तरंदळे धरणातून कुंदेवाडी येथील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणारी पाईप लाईन ठराविक शेतकऱ्यांची कबुली घेऊन करण्यात आली आहे. तसेच चारफूट जमिनीतून येणाऱ्या पाईपमधून पुढे शेतकऱ्यांनी पाणी पाटातून घ्यावयाचे आहे. पण ते कशाप्रकारे मिळणार याबाबत कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर सर्व्हेद्वारे शेतकऱ्यांना हे दाखवून नंतरच पाईपलाईनबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी लघु पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्याकडे केल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. तर मागणीनुसार कार्यवाहीचे आश्वासन जाधव यांनी दिल्याचेही उपरकर यावेळी म्हणाले.
परशुराम उपरकर यांनी शुक्रवारी जानवली येथील कार्यालयात जाधव यांची भेट घेतली. यावेळी उपविभागिय अधिकारी मंगेश माणगावकर, ग्रामस्थ गोपाळ हडकर, सुनील परब, संतोष बोडये, भालचंद्र दळवी, समीर परब उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, तरंदळे धरणातून सुरुवातीला कालव्यामार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र, त्यानंतर पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत अनेक ग्रामस्थांना कल्पना नाही. सद्यस्थितीत तरंदळे, कुंदेवाडीमध्ये पाणी नेण्यासाठीची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. चार फूट जमिनीतून हे पाईप घालण्यात येत असून त्यातून पाणी पुढे पाटाने जाणार आहे. पाईपलाईनचे पाणी किती प्रेशरने येणार? तसेच पाणी आले तर शेतकऱ्यांच्या शेतातून पाटाची व्यवस्था नाही. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या शेतातून दुसऱ्याला पाणी कसे मिळणार? असा सवाल उपरकर यांनी केला. या धरणातून ७७७हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असे दाखविण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांना पाणी मिळणार का? असा सवाल करण्यात आला. तर धरणालगतच असलेल्या पाटबंधारेच्या रस्त्याचा वापर करून घर बांधण्यात आले. त्याबाबतही कोणतीही बिनशेती वा इतर कार्यवाही झालेली नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जाधव यांनी आपण कुंदेवाडीकडे जाणाऱ्या पाईपलाईनबाबत प्रत्यक्ष सर्व्हे करून कार्यवाही करतो, असे आश्वासन दिल्याचे उपरकर यांनी सांगितले.
