मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास :भूखंड अडवून ठेवलेल्यांची चौकशी सुरु..
कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे जर शिवसेनेत येणार असतील तर आमदार निलेश राणे हे त्यांचे स्वागतच करतील, पक्षवाढीसाठी वैभव नाईकांसोबत प्रयत्नही करतील.असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज कुडाळ मध्ये शिवसेनेची आभार सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते. या मेळाव्यात उबाठा सेनेतून दीड हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. उबठातून संजय पडते यांच्यासारखे अनेक नेते शिवसेनेत आले आहेत. अनेकजण येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आमदार निलेश राणे शिवसेनेत असताना माजी आमदार वैभव नाईक शिवसेनेत येतील का, या प्रश्नावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, आमदार निलेश राणे यांनी आमदार झाल्यावर आपल्या स्वभावात खूप बदल केला आहे. त्यामुळे वैभव नाईक जर शिवसेनेत येत असतील तर आमदार निलेश राणेंच त्यांचे स्वागत करतील. शंभर टक्के ते समजून घेतील आणि त्यांच्या सोबत पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील. त्यामुळे वैभव नाईक यांनी देखील शांतपणे विचार करावा कि आपले सगळे सहकारी शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कुठे जायचे याचा त्यांनी विचार करावा. वैभव नाईक हे माझे कॉलेज मधील मित्र असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत यांनी सुरुवातीला पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उचलीत असलेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले. राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहेलगाम येथे असून एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे ते तिथे काम करत आहेत. तिथून ते कुडाळ येथील आभार सभेला येणार आहेत. या मेळावा शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. दीपक भाई केसरकर आणि निलेश राणे निवडून आल्यानंतर शिवसेनेचा पहिला मेळावा होतो आहे. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील. परंतु कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचे स्वागत करणार होतो ते स्वागत आम्ही रद्द केले आहे. साध्या पद्धतीने त्यांचे स्वागत होईल. साध्या पद्धतीने श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि म्हणून जे काही उत्साहाचा वातावरणामध्ये आम्ही जो मेळावा करणार होतो त्या स्वागताला बगल देऊन अतिशय साध्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत.
भाजपचा एकही सदस्य शिवसेनेत घेणार नाही !
सगळ्यात महत्त्वाची बाब की पक्षाच्या सभासद नोंदणीचा मी हल्लीच आढावा घेतला. अतिशय चांगल्या पद्धतीने सभासदनोंदणी झाली आहे. पण मला असं वाटतं की काही लोकांनी माझ्या परवाच्या त्यावेळच्या भाषणाचा काहीतरी गैरसमज करून घेतलाआहे. ज्याने कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांच्याबद्दल ठीक आहे पण मी असे बोललो होतो की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष आम्ही काम करतो आणि अन्य आरपीआय सारखे अनेक मित्र पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांना स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. स्वतःची सभासद नोंदणी करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे पुढे त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हे माझ्या मतदारसंघांमध्ये देखील त्यांच्या पक्षाच्या संघटनसाठी आले होते. संघटना वाढवण्यासाठी आले होते त्याचे मला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही. आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्या उबाठा सेनेतील लोकं आमच्याकडे येत आहेत, त्यांना आम्ही घेतो आहोत. कुठेही महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मी हात घालत नाही आणि आज देखील दीड ते दोन हजार पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आजच्या या मेळाव्यामध्ये होणार आहे. असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना जर काही शंका असेल तर त्यांनी माझ्याकडे कधीही यावे. माझ्याशी चर्चा करावी. कुठचाही भाजपाचा पदाधिकारी आम्ही घेणार नाही. आम्ही घेतलेला नाही आणि घेऊन नये अशा सूचना एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत. त्याच्यामुळे संघटना वाढवत असताना त्याच्यामध्ये कुठेही मित्र पक्षाला अडचण निर्माण होईल व मित्रपक्ष दुखावला जाईल अशा पद्धतीने काही आमच्याकडून काही होणार नाही. या संदर्भात माझी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे. चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी जर बावनकुळे साहेबांशी आणि नितेश राणेंशी चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्याने पुढे पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल असे आपले मत असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे पहेलगाम गेले नाहीत !
एकनाथ शिंदे किंवा गिरीश महाजन पहेलगाम येथे गेले यात श्रेयवादाचा काही विषय नाही. त्यांचा हा काम करण्याचा पिंड आहे. काही लोकांचा बडबड करण्याचा पिंड असतो. असा टोला त्यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत याना लगावला. ते म्हणाले, जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता काम करायचा काय थांबणार नाही. काही लोकांना बसून पत्रकार परिषद घ्यायची सवय आणि एकनाथ शिंदे काम करण्याची सवय आहे. त्यामुळे ते आणि गिरीश महाजन पहेलगाम येथे गेले. एकनाथ शिंदे हे तिथे जाऊन काय करत आहेत, याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पदाची काय गरजच नाही. मुख्यमंत्री डोंबिवली हजर होते आमचे काही मंत्री एअरपोर्टला होते आणि जो कार्यकर्ता आहे त्याच्यातला कार्यकर्ता कधी मरत नाही. त्यातला कार्यकर्ता जिवंत राहतो म्हणूनच एकनाथ शिंदे साहेब काश्मीरमध्ये आहेत. आता देखील शेवटचं फ्लाईट अडीच वाजता येणार आहे तिथल्या सगळ्या पर्यटकांना बसवण्याचं काम ते करत आहेत. हा शेवटी पिंड असतो काही लोकांचा फक्त बडबड करण्याचा पिंड आहे. काही लोकं टीका करतात, काही लोक लंडनला गेले तर आम्ही टीका करत नाही. त्याच्यामुळे कोणाला लंडनला जायचे आहे, कोणाला परदेशामध्ये जायचे आहे, त्यांनी त्यांचे काम करावे. त्यांना ते व्यक्तस्वातंत्र्य आ. हे परंतु जो माणूस साडेपाच वाजता जाऊन रात्रभर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करतो त्याच्याबद्दल असे बोलणे योग्य होणार नाही, असे श्री. सामंत म्हणाले. .
आमचा मेळावा करताना आम्ही स्वागताचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. पण काँग्रेसची कार्यकारणी सध्या दिल्ली मध्ये सुरु आहे. काही नेत्यांचे सिंधुदुर्गचे दौरे सुरु आहेत. बिहारमध्ये कार्यक्रम सुरु आहेत. त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम कशा पद्धतीने करतो ते बघा. हा कार्यक्रम हा उत्साहाच्या भरामध्ये केला असता तर आम्ही दोषी आहोत, परंतु त्यांच्याबद्दल काही वाटत असल्यामुळे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते पेहलगाम येथे जाऊन काम करताहेत, से श्री. शिंदे यांनी या मेळाव्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
काश्मीरला गेलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील पर्यटक सुखरूप
काश्मीरला गेलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आपण कायम त्यांच्या संपर्कात असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीचे मनोज जठार हे आणि त्याची पत्नी हे जवळजवळ 32 लोकांना घेऊन श्रीनगर मध्ये होते. ते आज एका रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहेत. रात्री निघतील. आणि दुसरे अमृता ट्रॅव्हल्स म्हणून रत्नागिरीतील सात लोक आहेत ते देखील सुखरूप आहेत. डॉक्टर देसाई म्हणून रत्नागिरीचे आहेत, त्यांचा रात्री माझ्याशी संपर्क झाला आहे. तसेच कणकवलीची एक मुलगी आहे, ती काल रात्री मुंबईत पोहोचली असल्याचेच श्री. सामंत यांनी सांगितले.
एमआयडीसी रेस्ट हाऊस कामाची चौकशी करणार
कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसचे काम योग्य दर्जाचे झाले नसल्याने या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. हे काम ८० लाख रुपयाचे असून योग्य दर्जाचे झाले नसल्याची बाब पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर यांनी याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मी स्वतः आज राहिलेला असल्यामुळे इथे काय झाले आहे याबद्दलच्या काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे ज्या काही सूचना द्यायच्या ते मुख्य अभियंतांना पण दिलेत आणि इथे डेप्युटी इंजिनियरना सुद्धा दिल्या आहेत.
आडाळी येथील भूखंडाच्या किमती कमी
आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा व्हायच्या अगोदर काही इंडस्ट्री आपल्याकडे होत्या. कुडाळचे वायमन गॉर्डन वगैरे कंपनी अशा कंपन्या होत्या. पर्यटन जिल्हा झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे काही निकष बदलले. त्यामुळे काही परवानग्या वगैरे घेण्यासाठी उद्योजकांना अडचणी निर्माण व्हायला लागल्या. म्हणून आता आडाळी येथे नवीन एमआयडीसी उभारण्यात येत आहे. आडाळी येथील भूखंडाच्या किमती या पूर्वी जास्त होत्या. पण आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांनी मागणी केल्यानुसार आता या किमती लवकरच कमी करण्यात येतील. याबाबत येत्या आठ ते दहा दिवसात निर्णय होणार आहे. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात अडाळी येथे प्रकल्प येतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर खासदार नारायण राणे यांनी गोव्याच्या लगत 500 ते 600 एकर जमीन आहे, ती देखील ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
भूखंड अडवून ठेवलेल्यांची चौकशी सुरु
दरम्यान कुडाळ एमआयडीसी ही वेगळ्या टाईपची एमआयडीसी होती. ही पूर्वी झालेली एमआयडीसी आहे. ही आपल्या कारकीर्दीत झालेली एमआयडीसी नाही. त्याच्यामध्ये आपण सर्वे करून चौकशी केली तर अनेक स्थानिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही गोष्टी त्यावेळी झालेल्या आहेत त्याची चौकशी होणं हे गरजेचे आहे. तो माणुसकीचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी मी अतिशय संवेदनशील पणे हाताळत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी वर्षानुवर्षे भूखंड घेऊन ठेवले आहेत पण त्यांनी काही केलेले नाही, ते काढून घेण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रोसिजर सुरू आहे असे उदय सामंत यांनी सांगितले.
