छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या तडाख्यात कोसळला…

शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट येथे धाव:नित्कृष्ट काम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा; वैभव नाईकांची मागणी..

⚡मालवण ता.२६-: नौसेना दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौसेनेतर्फे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा कोसळल्याचे कळताच मालवण मधील तमाम शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट येथे धाव घेतली. पुतळा उभारून केवळ आठ महिन्याच्या कालावधीत पुतळा कोसळल्याने या कामाच्या दर्जावर यावेळी शिवप्रेमीनी तीव्र संताप व्यक्त केला.

मालवणात आज पावसाचा जोर असताना दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने तडाखा दिला. याच वादळी वाऱ्यात राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णतः कोसळला. हि घटना समजताच शिवप्रेमीनी त्याठिकाणी धाव घेतली. याबाबत कळताच मालवण पोलिसांनी देखील धाव घेत त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवत किल्ल्याचा दरवाजा बंद करून जमलेल्या नागरिकांना प्रवेश नकाराला. यावेळी स्थानिक नागरिकांकडून पुतळ्याचे अवशेष कापडाने झाकून ठेवण्यात आले.

यावेळी आम. वैभव नाईक यांनीही तातडीने राजकोट येथे भेट देऊन पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा पुतळा नित्कृष्ट कामामुळे कोसळल्याने अतीव दुःख होत असून याचा आम्ही निषेध करतो. या कामाचे ऑडिट होऊन नित्कृष्ट काम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आम. नाईक यांनी केली.

You cannot copy content of this page