*पत्रकारांना योग्य ती माहिती मिळण्यासाठी केली नियुक्ती; जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे यांच्या मागणीला यश
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* कोरोना या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पत्रकारांना योग्य ती माहिती मिळावी आणि जिल्ह्यातील जनतेपर्यंत अचूक अशी माहिती पोहोचावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पब्लिक रिलेशन ऑफिसर नियुक्त करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक विजय वीर यांची तातडीने पीआरओ म्हणून नेमणूक केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना दिलेल्या विनंती पत्रात असे नमूद केले होते की, आपण स्वतः आणि आपल्या जिल्ह्यातील अधिकारी, डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी covid-19 शी मोठ्या मेहनतीने लढत आहेत. तरी ही परिस्थिती गंभीर आहे. कोणत्याही रोगाच्या साथिचे संकट जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा चुकीची माहिती व पसरविल्या जाणाऱ्या अफवा अशा संकटांशी लढण्यासाठी अडथळा ठरले आहेत. सध्याच्या कोरोना साथिशी लढताना अशा अफवा व चुकीची माहिती पसरवली जाते त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. या साथीच्या काळात पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मदत करू इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था यांना कोविड चे सध्याचे स्वरूप, उपायोजना, त्यामधील त्रुटी, मर्यादा, सुविधांची वस्तूस्थिती सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सध्या दिवसातून एक प्रेस नोट येते परंतु ती पुरेशी नाही. ऑक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन, डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी तसेच लसीकरणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी सर्वांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागते. त्यामुळे या अधिकाऱ्यांसमोर रुग्णांना वाचवायचे की माहिती देण्यासाठी फोन स्वीकारायचे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ही सर्व माहिती देणारा पिआरो तातडीने नेमणे आवश्यक आहे. असा अधिकारी नेमला तर पत्रकारांना लोकप्रतिनिधींना व इतरांना सर्व माहिती मिळू शकेल. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना ही रुग्णांचा स्टेटस काय आहे. याची माहिती पीआरओ कडून मिळण्यास मदत होईल तरी कृपया या पत्राचा विचार करून तसा पीआरओ नेमावा असे नमूद केले होते. जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविल्यानंतर तातडीने दखल घेत त्यांनी पी आर ओ म्हणून विजय विर यांच्याकडे जबाबदारी सोपवत असल्याचे सांगितले . श्री वीर हे पूर्वीपासूनच माहिती गोळा करणे व पुरविण्याचे काम करतच होते. त्यांच्याकडे आता अधिकृतरित्या जबाबदारी देण्यात आली असून ते पि आर ओ म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांना कोणतीही माहिती हवी असल्यास 9881979292 हा त्यांचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री जेठे यांनी केले आहे.