माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षणास देवली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

*💫मालवण दि.०८-:* कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्यावतीने माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार देवली गावात सध्या नियुक्त केलेल्या आरोग्य पथकाच्यावतीने घरोघरी भेटी देत प्रभावीपणे सर्वेक्षण केले जात आहे. ग्रामस्थांकडूनही या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ५ मे ते १४ मे या कालावधीत गावागावात माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या तालुक्यातील देवली गावात सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या कृती समिती सदस्यांच्या पथकाद्वारे गावातील प्रत्येक घरात जात सर्वेक्षण केले जात आहे. या पथकातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शून्य ते सहा वयोगटातील मुलांचे, गरोदर मातांचे, स्तनदा मातांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक घरात जावून याचेही सर्वेक्षण केले जात आहे. ग्रामस्थांकडूनही या मोहिमेस चांगले सहकार्य मिळत असल्याचे दिसून येत आहे.

You cannot copy content of this page