भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा
मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके केली.
दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात प्रथम कनिष्ठ महाविद्यालयातर्फे योग दिन साजरा झाला. यावेळी संस्था पदाधिकारी श्री. गोलतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी दशरथ कवटकर, प्राचार्य हणमंत तिवले, प्राध्यापक पवन बांदेकर व इतर शिक्षक उपस्थित होते. यावेळी प्रा. बांदेकर यांनी योगाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर प्रा. बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षासन, उत्कटासन, ताडासन, अर्धकटी चक्रासन, वीरभद्रासन १, वीरभद्रासन २ ही योगासने व प्राणायाम केले. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
तर दुसऱ्या सत्रात भंडारी हायस्कुलतर्फे योग दिन साजरा झाला. यावेळी योगज्योती ग्रुपच्या योगशिक्षिका सौ. दीपा वनकुद्रे, योगसाधक सौ. संस्कृती बांदकर व सौ. नंदिनी गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी मुख्याध्यापक हणमंत तिवले व क्रीडा शिक्षक श्री. देसाई आदी उपस्थित होते. श्री. तिवले यांच्या हस्ते योगज्योती ग्रुपच्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका सौ. दीपा वनकुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकारी सौ. बांदकर व सौ. गावकर यांच्या सहकार्याने उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वृक्षासन, ताडासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, भुजंगासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार आदी योग प्रकारांची प्रात्यक्षिके केली.
