⚡मालवण ता.२०-: मालवण – आचरा रस्त्यावर हडी येथे भरधाव दुचाकीस्वाराने समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय-२८, रा. हडी जठारवाडी) हा जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण येथील एसटी आगाराची मालवण-तांबळडेग (क्रमांक- एम एच-१४ बीटी -१७७९) ही बस दुपारी मालवण- आचरा- देवगड मार्गाने तांबळडेगच्या दिशेने जात होती. या दरम्यान आचरा हडीच्या दिशेने जाणाऱ्या शिवाजी सुर्वे याच्या ताब्यातील भरधाव दुचाकीची (क्र. एम एच ०७- एम- ०९७२) मालवण- तांबळडेग बसला जोरदार धडक बसली. हडी येथील नागेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर हा अपघात घडला. या धडकेत दुचाकीस्वार शिवाजी सुर्वे याचे डोके एसटी बसच्या पुढील भागास आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती एसटीचे चालक धर्मांण्णा मौला नडगिरी यांनी मालवण पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळविली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नांदोसकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत पेडणेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी जात अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मृत्यू पावलेल्या शिवाजी सुर्वे याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शिवाजी सुर्वे याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
