पत्नीवर हल्ला प्रकरणी पतीला दोन दिवस पोलिस कोठडी…

⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील पत्नी आपल्या सोबत राहत नाही या रागातून चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सूरज बैजामिन घंटेपोक (३२, रा. कोनाळकट्टा-दोडामार्ग) याला रविवारी वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही घटना शनिवारी सकाळी पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील एका दुकानात घडली होती. दरम्यान, कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत संशयित सूरज याच्याकडून पत्नीवर वार करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे.
सूरज याची पत्नी भारती सूरज घंटेपोक (२७, सध्या रा. केळूस मधलीवाडी) पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील एका दुकानात कामाला आली होती. या दाम्पत्यामधील कौटुंबिक वादातून शनिवारी भरदिवसा सूरज याने दुकानात येऊन आपल्या पत्नीच्या मानेवर व पाठीवर चाकूने वार करीत तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या सूरज याला पिंगुळी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. रविवारी त्याला वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत ‌.सूरज याने गुन्हयात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर करीत आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page