मालवण ग्रामदैवत सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा…

युवाईने केलेली कागदी फुलांची तिरंगी माळ व चांद्रयान ३ चा देखावा ठरले आकर्षण..

⚡मालवण ता.२७-:
मालवण देऊळवाडा येथील मालवणचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेली श्री देव रामेश्वर – श्री देव नारायण यांची पालखी मिरवणूक व सुमारे ३०० कागदी फुलांच्या माळांची आरास आणि २ हजार पणत्यांची आरास करण्यात आली. तसेच चांद्रयान ३ व २६/११ अशी तिरंगा थीम बनविण्यात आली होती. आजकाल विविध उत्सवात प्लास्टिक फुले व इतर प्लास्टिक सजावट साधनांद्वारे आरास केली जात असताना देऊळवाडा येथील युवाईने पर्यावरणाचा संदेश देत केलेली कागदी फुलांची तिरंगी माळ व चांद्रयान ३ चा आकर्षक देखावा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

श्री सातेरी देवी मंदिरातील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त या परिसरातील युवतींनी गेले महिनाभर मेहनत घेत तिरंगी कागदापासून सुमारे ३०० कागदी माळ बनवले. यात २० ते २५ तरुणी सहभागी झाल्या होत्या. या कागदी फुलांच्या माळा बनवून त्यांची आरास सातेरी देवी मंदिराच्या मार्गावर आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. तर मंदिर प्रवेशद्वारावर चांद्रयान ३ व तिरंगा अशी स्वागत कमान तयार करण्यात आली होती. यासाठी आई सातेरी बालगोपाळ मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. तर यावेळी २ हजार पणत्यांची आरास करून दीपोत्सवही साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रामदेवतांच्या पालखी प्रदक्षिणेवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

You cannot copy content of this page