अभिजीत पानसे यांचा दावा:मनसेला आत्तापर्यंत यश मिळाले त्या दुपटीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल,..
कुडाळ, प्रतिनिधी : कोकण पदवीधर निवडणूक मनसे स्वबळावर लढवित असून यावेळी कोकणमधून विधान परिषदेचा आमदार मनसेचाच असेल असा दावा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी करताना मनसेला आत्तापर्यंत यश मिळाले त्याहीपेक्षा दुपटीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल, असा विश्वास त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदारसंघातल्या मतदार नोंदणी संदर्भात आणि पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते अभिजित पानसे आज (रविवारी) सिंधुदुर्गात आले होते. यावेळी मनसेच्या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मनसे स्वबळावर लढवित आहे. यावेळी आम्हाला खात्री आहे की, विधान परिषदेचा आमदार मनसेचाच असेल. आतापर्यंत तब्बल १६ हजार पेक्षा जास्त पदवीधरांनी नोंदणी आमच्याकडे केली असून ती २५ ते ३० हजार पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
निरंजन डावखरे दिसले का ?
निरंजन डावखरे हे मागील दोन टर्म कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. आमदारांनी कोकणातील पदवीधर युवक- युवतींसाठी काम करून त्यांच्या अडचणी दूर करणे महत्त्वाचे असते. मागील १२ वर्षात निरंजन डावघरे सिंधुर्गात दिसले का असा सवालही यावेळी मनसेनेचे अभिजीत पानसे यांनी उपस्थित केला. मनसेने शिक्षण विषय आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पदवीधरांचे प्रश्न मनसेने थेट राज्य सरकारपर्यंत पोहोचविले आहेत आणि त्यातून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
