भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ..
बांदा/प्रतिनिधी
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत बांद्यात आज पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शनचे वाटप भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बांदा व पंचक्रोशीत नव्याने २५० लाभार्थी महिला असून त्यांना टप्प्याटप्प्याने गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, भाजपा महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
सौ. कोरगावकर म्हणाल्या की, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही महिलांसाठी लाभदायक असून यासाठी रेशनकार्ड, घरातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्वांची आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे जमा केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार आहे. बांदा पंचक्रोशीत नव्याने २५० जणांना याचा लाभ मिळणार असल्याने महिलांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.
