मालवण येथील मच्छिमारांची मत्स्य विभाग कार्यालयावर धडक…

आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने१ डिसेंबरपासून उपोषण छेडण्याचा दिला इशारा…

⚡मालवण ता.२४-: आठवडाभरापूर्वी पारंपारिक मच्छिमारांनी अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई व इतर मागण्यांसाठी छेडलेले उपोषण मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले असताना या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने आज पारंपारिक मच्छिमारांनी पुन्हा मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. अलगिरी यांची भेट घेऊन मागण्याबाबत चार दिवसात कार्यवाही न झाल्यास पुन्हा दि. १ डिसेंबर पासून भर समुद्रात उपोषण छेडू, असा इशारा पारंपारिक मच्छिमारांनी दिला.

तळाशीलमधील समुद्रात पर्ससीन आणि पारंपारिक मच्छिमार यांच्यात झालेल्या संघर्षानंतर आक्रमक झालेल्या पारंपरिक मच्छीमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाईसह इतर मागण्यासाठी आठवडाभरापूर्वी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. मालवणचे परवाना अधिकारी अकार्यक्षम असून त्यांना निलंबित करावे, बंदरांमध्ये ये- जा करणाऱ्या नौकांची नोंदणी ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या मालवण, सर्जेकोट आणि आचरा बंदरातील सागर सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात यावे, बंदरांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत आणि आचऱ्यातील जप्तीची आदेश असलेली नौका तात्काळ ताब्यात घ्यावी. तसेच आता अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाईसाठी दस्तरखुद्द मत्स्यविकास आयुक्तांनीच मालवणात यावे, या प्रमुख पाच मागण्या पारंपरिक मच्छीमारांनी केल्या होत्या. या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सहाय्यक मत्स्यविकास आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिल्याने मच्छिमारांनी उपोषण स्थगित केले होते.

मात्र या मागण्याबाबत मत्स्य विभागाकडून कार्यवाही होत नसल्याबाबत आज पारंपारिक मच्छिमारांनी पुन्हा एकदा मत्स्य कार्यालयात सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. अलगिरी यांची भेट घेऊन मत्स्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, उपाध्यक्ष भाऊ मोर्जे, सन्मेष परब, रश्मीन रोगे, जगदीश खराडे, हेमंत मोंडकर आदी व इतर मच्छिमार उपस्थित होते.

उपोषणाच्या वेळी मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कामावरून हटविण्याची मागणी केलेले सागरी सुरक्षा रक्षक अजूनही कामावर रुजू आहेत, आचरा येथील पर्ससीन नौकेवर कारवाई झालेली नाही, तळाशील समुद्रात झालेल्या संघर्षात सामील असलेल्या अनधिकृत पर्ससीन नौकवरही कारवाई झालेली नाही, असे यावेळी मिथुन मालंडकर यांनी सांगितले. पारंपारिक मच्छिमारांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना मत्स्य विभागाला त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात आमच्या मागण्याबाबत कार्यवाही न झाल्यास पुन्हा १ डिसेंबर पासून भर समुद्रात उपोषण करू, असा इशारा यावेळी पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने मिथुन मालंडकर यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. अलगिरी यांना दिला.

You cannot copy content of this page