⚡कुडाळ ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह संततधार पाऊस झाला. यामध्ये सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हिर्लोक, नारूर, माणगाव, वाडोस, पांग्रड, वेताळ बांबर्डे, पणदूर आदी गावांमध्ये हा पाऊस आला.
काही दिवसांपूर्वीच थंडीचे आगमन झाले असतानाच दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील बागायतदार वर्गाची चिंता वाढली आहे. या काळातच आंबा, काजू, जांभूळ, फणस आधी पिकांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु, अवकाळी पावसामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. तसेच आंबा, काजू उत्पादनातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
