मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी
⚡कुडाळ ता.०५-:
भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या शुक्रवार, ८ सप्टेंबर २०२३ रोजी कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील पथके दाखल होणार असल्याची माहिती भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दादा साईल म्हणाले की, या दहीहंडी उत्सवातून सिंधुदुर्गातील जनतेला दहीहंडीसारख्या साहसी खेळाचा थरार पाहता येईल. या उत्सवात
विजेत्या संघाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस असेल
तसेच या दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, सिनेअभिनेत्री मानसी नाईक, प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम, प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे यांचे असेल.
या व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि त्यांचे सहकलाकार यांचा लाईव्ह संगीत शो आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रिवा अरोरा सुद्धा कुडाळमध्ये दहीहंडी उत्सवाला उपस्थित असतील.
लेझर शो आकर्षण ठरणार
शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर हा उत्सव रंगणार असून यामध्ये लेझर शो मुख्य आकर्षण असेल.
मेरी माटी, मेरा देश संकल्पना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी, मेरा देश” ही संकल्पना दहीहंडी महोत्सवात असेल. यामध्ये प्रत्येक बुथमधून प्रत्येकी एक कलश माती आणून कुडाळ एसटी मैदानावर मोठ्या कलशात एकत्र करण्यात येईल. हा मोठा कलश प्रथम राज्यात आणि नंतर दिल्लीत जाईल, अशी माहिती दादा साईल यांनी दिली.
२६ पथकांची नोंदणी
आतापर्यंत या दहीहंडी महोत्सवासाठी २६ दहीहंडी पथकांची नोंदणी झाली असून यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पथकांचा समावेश आहे.
या उत्सवासाठी उद्या संध्याकाळपर्यंत नावनोंदणी होईल. यासाठी रुपेश कांबळे मो. क्र. ७०२०३६३८९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दादा साईल यांनी केले आहे.
