सिंधुदुर्गातील चार रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

राज्य शासनाची योजना:उद्या शुभारंभ

ओरोस ता.०७-:

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निर्माण केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेतील 508 रेल्वे स्थानकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या योजनेत राज्यातील 44 स्थानकांचा समावेश आहे.
याच धर्तीवर राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या 19 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षीच्या बजेट मध्ये यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचा यात समावेश असून याद्वारे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण,स्थानक परिसर विकास,पार्किंग,गार्डन तसेच मूलभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या योजनेमधून सदरची स्थानके हाय फाय होणार आहेत.
जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळ सिंधुदुर्ग व कणकवली अशी चार स्थानके योजनेत असून मंगळवारी या चारही रेल्वे स्थानकांच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण व मान्यवरांचा उपस्थितीत आभासी पद्धतीने संपन्न होणार आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर राजन तेली, कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत आणि कणकवली रेल्वे स्थानकावर आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
चारही स्थानकांवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील आणि आपले मंत्री महोदय यांना धन्यवाद देतील.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारा असा उपक्रम असून येत्या चतुर्थीला प्रवाशी तसेच नागरिक यांना नवीन रस्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेता येईल अश्या प्रकारचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांनी बांधकाम विभागाला नियोजन दिलेले आहे, अशी माहिती प्रभाकर सावंत यांनी दिली.

You cannot copy content of this page