मालवणचे माजी नगरसेवक पुंडलिक कांदळकर यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन

⚡मालवण ता.२२-: मालवणचे माजी नगरसेवक आणि भंडारी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष(मालवण)मुंबईचे लोकल कमिटीचे अध्यक्ष तसेच मेढा मालवण येथील रहिवासी पुंडलिक शिवराम तथा दादा कांदळकर (वय ९६) यांचे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

मालवण मेढा येथील रहिवासी असणारे पुंडलिक शिवराम कांदळकर हे दादा या नावाने परिचित होते. समाजवादी विचारसरणी असणाऱ्या दादा कांदळकर यांनी सुरुवातीच्या काळात जनता पक्षाचे आणि तदनंतर जनता दलाचे अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्टेने काम केले. त्यांच्या घरी समाजवादी नेत्यांचा नेहमीच राबता असायचा. बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रा. मधू दंडवते, बबन डिसोजा, साथी किशोर पवार या आणि अन्य समाजवादी नेत्यांच्या सहवासात काम करणाऱ्या दादा कांदळकर यांनी मालवण शहराच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका मांडली. मालवणच्या भंडारी हायस्कुलचे ते माजी विध्यार्थी होत त्यांचे माध्यमिक शिक्षण भंडारी हायस्कुल मालवण येथे झाले होते. ते व्हॉलीबॉलपटू म्हणून ओळखले जायचे मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी ( मालवण ) मुंबई या संस्थेचे लोकल कमिटीचे ते २७ वर्ष अध्यक्ष होते. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामाची जबाबदारी त्यांनी मोठ्या यशस्वीतेने पार पाडीत पूर्ण केली. १९७६ पासून सलग वीस वर्ष ते मालवण नगरपालिकेचे नगरसेवक होते. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य सभापती तसेच इतर पदे भूषविली होती मालवण शहराच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा होता .

आज सायंकाळी त्यांच्यावर मालवण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page