मालवण शहरासह तालुका जलमय: अनेक घरात दुकानात पाणी घुसले…
⚡मालवण ता.२०-: आज मालवणला ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षराश: कहर माजवत झोडपून काढल्याने मालवण शहरासह तालुका जलमय झाला.
अतिमुसळधार पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरून घरांमध्येही पाणी शिरल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. देऊळवाडा येथे मुख्य रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी भरल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. तर शहरासह तालुक्यात झाडे उन्मळून तसेच वादळी वाऱ्याने कोसळून घरे व इतर सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मालवणला धुव्वाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण होऊन अनेक घरांना पाण्याने वेढा दिला आहे. अनेक घरात, दुकानात पाणी घुसले आहे. मालवण पेट्रोल पंप देऊळवाडा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. येथील घरातही पाणी घुसले. दरम्यान खबरदारी उपाययोजना म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. अपघात व अन्य धोका टाळण्यासाठी याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी माहिती देताना सांगितले.
मालवण बसस्थानक समोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुकाने व घरातही पाणी शिरले. मालवण बसस्थानक मार्गावरील जलमय स्थिती कायम असून येथील घरे दुकाने पाण्याने वेढली आहेत. बसस्थानक ठिकाणी पाणी भरून दुकाने घरात पाणी शिरल्याने भाजप कार्यकर्ते दादा वाघ यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. मालवण तालुक्यातील जलमय स्थितीबाबत तहसीलदार वर्षा झालटे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व प्रशासन लक्ष ठेवून आहेत. माहिती घेऊन अथवा आपत्ती स्थिती ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मदतकार्य उपाययोजना प्रशासन माध्यमातून सुरू आहे.
पावसामुळे मालवण शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. देऊळवाडा येथे नागू अंबाजी वळकर हे मोलमजुरी करून राहत असलेल्या कुटुंबाच्या झोपडी वजा घरात झाड कोसळले. यात घरातील साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुकळवाड येथे लवू लक्ष्मण चिंदरकर यांच्या घराचे पडझडीमुळे नुकसान झाले. रेवतळे येथील संगीता संजय मंडलिक यांच्या घरात पाणी घुसल्याने सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. घरात अन्नधान्यसह व विद्युत उपकाराणांचे नुकसान झाले. मंडलिक यांच्या घरात घुसलेल्या पाण्यावर भांडी कुंडी तरंगत होती. या भागात घराच्या लागत असणारा पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने मंडलिक यांच्या घरात पाणी घुसल्याचे सांगण्यात आले. मंडलिक यांच्या घरात पाणी घुसल्या नंतर माजी नगरध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, विश्वास गावकर, अरुण तोडणकर व इतरांनी धाव घेत मदतकार्य केले.
वायरी भूतनाथ येथील कृष्णा शांताराम गोसावी यांच्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड होउन सुमारे ३५,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाह चालू असताना ही दुर्घटना घडली. यावेळी त्यांच्या घरात अपंग मुलगी अंथरुणात होती. मात्र सुदैवाने तिला दुखापत झाली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तलाठी श्री. राठोड यांनी भेट देऊन पंचयादी तयार केली. यावेळी छोटू सावजी, भाई मांजरेकर, अमित गोसावी, प्रविण सरकारे, मंदार लुडबे, भाई ढोके उपस्थित होते. वायरमन श्री. चेंदवणकर यांनी तात्काळ वीज खंडीत करुन सहकार्य केले.
देवबाग मोबारवाडी येथील संजय कुमठेकर यांच्या राहत्या घरावर माड कोसळून नुकसान झाले. तर वायरी जाधववाडी येथे सुनील मोरजकर, संतोष तारी यांच्या घरात पाणी शिरले. याठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपत्कालीन यंत्रणा नसल्याचे सांगत भाई मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पावसाचा जोर सायंकाळी उशिरा पर्यत कायम आहे.
