गणेश ठाकूर:हळबे महाविद्यालयात अभिनय कार्यशाळा
⚡दोडामार्ग,ता. १८-: प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना एखादी कला घेऊनच येतो. त्या कलेचा शोध घेऊन त्याचा विकास करा. साधना आणि तपश्चर्येने कला समृद्ध होते.त्याने कलाकार मोठा होतो.त्यामुळे स्वतः मधल्या कलेचा शोध घ्या.तिचा विकास करा.त्यासाठी मेहनत घ्या.कष्ट करा.निरीक्षण क्षमता वाढवा.एकमेकांचा आदर करा.आपल्याकडचे ज्ञान दुसऱ्याला दया,असे आवाहन सासोली येथील रंगभूमीवरील प्रतिथयश कलाकार,दिग्दर्शक व गणेश मूर्तिकार गणेश ठाकूर यांनी केले.
येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात नाट्य कला, चित्रकला, मातीकाम,मिमिक्री,गायन या विविध विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर चित्रपट कलाकार अरुण गवंडळकर, रात्रीस खेळ चाले मालिकेत काम केलेले उदय पास्ते. महाविद्यालयाचे प्राचार्य पी. सुभाष सावंत,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.डी गाथाडे उपस्थित होते.
यावेळी श्री. पास्ते म्हणाले, कलाकार जडणघडणीमध्ये अन्य कलाकार,त्याचे कुटुंबीय, शाळा, महाविद्यालय आणि समाजाची भूमिका महत्त्वाची असते.
श्री. गवंडळकर यांनी विविध प्राणी, पक्षी व कलाकारांचे आवाज काढून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.कलाकाराला श्रोत्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो असे म्हटले.प्राचार्य डॉ. सुभाष सावंत म्हणाले, कला आत्मसात करण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही.डॉ. गाथाडे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन शुभम जाधव यांनी केले. गौरवी सावंत हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रिया नाईक, ऋतुजा गवस, वैभवी कदम, डिंपल राजपुरोहित,शिवानी उगाडेकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
