बांदा वाफोली रस्त्याची तात्पुरती तरी उपायोजना करा …

अशोक परब ; प्रशासनाकडे मागणी

बांदा : प्रतिनिधी
बांदा-वाफोली मार्गावरील शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीस जीवघेणा ठरला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच मार्गावर अपघात होऊन एक जण गंभीर झाला असून उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले. गणेशोत्सव तसेच येथून ये जा करणारे प्रवासी, विद्यार्थी, गावातील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने निदान तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याची मागणी वाफोलीतील ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली आहे.


बांदा शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली असून रस्ता खड्डयांनी व्यापला आहे. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 2019 पासून पाठपुरावा सुरू आहे. सदर रस्त्याचे काम मंजूर असून पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे बांदा ग्रामपंचायत मधून सांगण्यात आले. मात्र सद्यस्थितीत या खड्ड्यात व खचलेल्या मोरी पुलाजवळ अनेक अपघात झाले. त्यामुळे चार महिन्यांची वाट न पाहता तात्पुरत्या स्वरूपात तरी रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब व ग्रामस्थांनी केली.
सदर मार्गावरील मोरीपूल रस्त्यापासून चार फूट लांब अंतरावर खचलेल्या स्थितीत आहे. अतिवृष्टी झाल्यास येथून ये जा करणाऱ्या वाहनचालक, प्रवासी, नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन उपाययोजना करावी असे काही वाहन चालकांनी सांगितले.

दरम्यान, बांदा ग्रामपंचायतची संपर्क साधला असता अपघात टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपायोजना करू. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर होणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी केले आहे.

फोटो——-
बांदा : खचलेले मोरीपूल व अपघाती खड्डे दाखविताना ग्रामस्थ.

You cannot copy content of this page