३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ घ्यावा:सुरेश पेडणेकर

⚡कणकवली ता.१६-:
३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील वेतनवाढीच्या दिनांकापासून ०१ वर्षाची सेवा पूर्ण झाल्याने १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ देऊन त्यानुसार सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याबाबतचे आदेश केले आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालय व नंतर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या निवाडा आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने २८/०६/२०२३ च्या शासन परिपत्रकाने ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील वेतनवाढीच्या दिनांकापासून ०१ वर्षाची सेवा पूर्ण झाल्याने १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ देऊन त्यानुसार सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याबाबतचे आदेश केले आहेत. ०१ जुलै ही नियमित वेतनवाढीची तारीख सहाव्या वेतन आयोगापासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आली.
त्यामुळे सहाव्या वेतन आयोगाच्या कालावधीपासून जे-जे कर्मचारी ३० जून अखेर सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारी सेवा पूर्ण केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कर्मचारी यांनी आपला मागणी अर्ज नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या नावे व संबंधित खातेप्रमुखांकडे करावयाचा आहे. असे संबंधित कर्मचारी ज्या दिनांकाला आपला अर्ज दाखल करतील त्या दिनांकाच्या मागील ३ वर्षाची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात येणार आहे.
तरी असे जे शिक्षक कर्मचारी पात्र असतील त्यांनी आपला अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व आपले मूळ सेवापुस्तक ज्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे असेल त्या गट शिक्षणाधिकारी यांचेकडे करावयाचा आहे. ०७/०७/२०२३ च्या शासन परिपत्रकानुसार याचा लाभ खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही लागू करण्यात आला आहे. तरी पात्र शिक्षकांनी आपले अर्ज वेळीच प्रशासनाकडे दाखल करावेत. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, विजय मयेकर व रमेश आर्डेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

You cannot copy content of this page