तारकर्लीच्या नमिता गावकर झळकणार ‘वेतोबा’ मालिकेत

⚡मालवण ता.१५-: मालवण तारकर्ली येथील ज्येष्ठ अभिनेत्री सौ. नमिता गावकर या ‘सन मराठी’ या वहिनीवर १७ जुलै पासून सुरु होणाऱ्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेत झळकणार आहेत. गेली अनेकवर्षे नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, लघुपट व वेबसिरीज मध्ये अभिनय साकारणाऱ्या नमिता गावकर वेतोबा मालिकेच्या निमित्ताने टीव्ही मालिकेत प्रथमच मोठी भूमिका साकारत आहेत.

कोकणातील जागृत देवता मानल्या जाणाऱ्या श्री देव वेतोबा वर आधारित क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ही मालिका सन मराठी या वाहिनीवर १७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्थानिक कलाकार विविध भूमिका साकारताना दिसणार आहेत. सावंतवाडी मळगाव येथे या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे.

या मालिकेमध्ये मालवण तारकर्ली येथील ज्येष्ठ अभिनेत्री नमिता गावकर या एका कडक स्वभावाच्या सासूची भूमिका साकारत आहेत. नमिता गावकर यांनी यापूर्वी क्राईम डायरी, गाव गाता गजाली, रात्रीस खेळ चालें, बयो या टीव्ही मालिकांमध्ये, उलट्याचा सुलटा, महिमा घुमडाईचा, रेडू, बोगदा, मळभ, कुर्ला टु वेंगुर्ला, ऑनलाइन शाळा, पिकोलो, सनफ्लॉवर, सोरट या चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपली छाप सोडली आहे. तसेच लक्ष कोंकण, मालवणी रायता, ढोकळ्यान घेतली खाज्याची बशी, भास आभास या वेबसिरीज मध्ये आणि दायित्व या लघुपटातही त्यांनी काम केले आहे. तसेच मालवणी भाषेतील नाटकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत.

श्री देव वेतोबा हे कोकणवासियांचे श्रद्धास्थान असून वेतोबाचा महिमा सांगणाऱ्या या मालिकेत काम करणे ही आपल्यासाठी एक अनोखी संधी असल्याचे नमिता गावकर यांनी सांगितले. वेतोबा वर आपलीही श्रद्धा असल्याचे नमिता गावकर यांनी सांगत मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान एक प्रसंग साकारताना आपण सारखे संवाद बोलताना अडखळत होतो, बरेच रिटेक घ्यावे लागत होते, यापूर्वी आपल्या अभिनयात असे कधीही झाले नसल्याने त्यावेळी आपण मनात वेतोबा कडे साकडे घातले असता पुढच्याच प्रयत्नात तो प्रसंग आपण कुठेही न अडखळता व्यवस्थित चित्रित झाला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

You cannot copy content of this page