प्रशासक मुख्याधिकाऱ्यांमुळे मालवणचा विकास रखडला

महेश कांदळगावकर;म्युझिकल फाऊंटन, बोट रायडिंग बंद

मालवण (प्रतिनिधी)

मालवण नगरपालिकेतील मुख्याधिकारी व प्रशासक हे पद एकाच व्यक्तीकडे असून त्यावर कोणाचाही अंकुश नाही. या प्रशासकीय राजवटीचा फटका मालवणच्या विकासाला बसत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या निधीतून झालेल्या कामांबाबत हेळसांड होत आहे. पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या रॉक गार्डनची प्रशासकीय राजवटीत दुरावस्था झाली असून त्यातील कोट्यावधी रुपये खर्चून साकारलेले म्युझिकलं फाउंटन, तसेच तलावातील लहान मुलांचे बोट रायडींग बंद आहे. गार्डन मधील टॉयलेटचीही अपुरी व्यवस्था आहे. मुख्याधिकारी व प्रशासनाच्या या कारभाराबाबत तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या रॉक गार्डनची दुरावस्था झाली आहे. पर्यटन निधीतून सुमारे १ कोटी रुपये निधी मंजूर करून घेऊन म्युझिकल फाऊंटन कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर याठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक लोकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. परंतु मागील चौदा महिन्या पासून लोकप्रतिनिधीचा कालावधी संपून प्रशासक कालावधी सुरू झाला आणि रॉक गार्डनच्या या सुविधाकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिनाभर फाऊंटन व म्युझिक सिस्टिमही बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

रॉक गार्डन मध्ये लहान मुलांसाठी बोट रायडिंग साठी दोन लहान तलाव बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी बोटींग पासून नगरपालिकेला उत्पन्न देखील मिळत होते. पण नादुरुस्त बोटीचे कारण सांगून बोटिंग मागील वर्षभर बंद आहे. जुन्या बोटी दुरुस्ती बाबत किंवा नविन बोटी खरेदीबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळेच या पासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे.

म्युझिकल फाऊंटन बसविल्यानंतर या ठिकाणी नाममात्र पाच रुपये प्रवेश फी बसविण्यात आली आहे. ज्यामुळे नगरपालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे. पण योग्य नियोजन नसल्याने लाखो पर्यटक भेट देऊनही त्यामानाने फीची रक्कम प्राप्त झालेली नाही. यामुळेही नगरपालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. रॉक गार्डन मधील टॉयलेट व्यवस्था देखील अपुरी पडत आहे. कायम स्वरूपी उपाययोजना करेपर्यंत मागील दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या, आणि दुरुस्ती देखभालचे टेंडर न केल्याने बंद असलेल्या बायोटॉयलेट गाड्यापैकी एक गाडी याठिकाणी ठेवण्याबाबत सूचना करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामूळे पर्यटकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या कालावधीत आपापल्या परीने पर्यटनाच्या दृष्टीने रॉक गार्डन जास्तीत जास्त कसे आकर्षित दिसेल याबाबत मेहनत घेतली आहे. पण सध्या प्रशासक पदाच्या १४ महिन्याच्या कालावधीतील दुर्लक्षामुळे दुर्दशा झालेली आहे. प्रशासक याना वेळोवेळी कळवून, निदर्शनास आणूनही ही परिस्थिती उद्भवली आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही, असेही कांदाळगावकर यांनी म्हटले आहे.

मालवण मधील फोवकांडा पिंपळपार येथे असलेला कारंजा गेले सात ते आठ महिने बंद आहे. गेट तुटून पडले आहे, लाईट बंद पडल्या आहेत. याबाबत सूचना देऊनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही. मालवणच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्न करायचे, मंत्रालयाच्या चकरा मारून आपल्या आमदार, खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध घेऊन विकासकामे करायची आणि प्रशासकीय राजवटीत जर प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे, ‘हम करेसो कायदा’ अश्या प्रकारे मनमानी कारभारामुळे शासनाच्या निधीतून झालेल्या विकास कामाच्या दुरुस्ती देखभाली बाबत हेळसांड होत असेल तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्यामूळे या बाबत ज्या पालकमंत्र्यांच्या कालावधीत निधी मंजूर झाला आहे, त्या पालकमंत्र्यांना या बाबी निदर्शनास आणून देणार, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page