क्यार वादळ बाधित मच्छीमार महिलांना सानुग्रह अनुदानासाठी केरकर दांपत्याचे उपोषण

मत्स्य विभागाने जमा केले १४२ महिलांचे अनुदान

मालवण दि प्रतिनिधी

क्यार वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमार महिलांना शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान मिळण्यापासून अद्यापही अनेक महिला वंचित असल्याने आज महिला दिनाचे औचित्य साधत तारकर्ली येथील डॉ. जितेंद्र केरकर व सौ. स्नेहा केरकर यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक महिला सहकारी संस्थेच्या देवगड येथील मत्स्य विक्रेत्या १४२ महिला सभासदांचे प्रत्येकी ६ हजार रुपये अनुदानाचे धनादेश बँकेत सादर करण्याची कार्यवाही मत्स्य विभागाकडून करण्यात आली तसेच उर्वरित ५३० नुकसान ग्रस्त महिलांचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच त्वरित अनुदान वितरित करण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांनी दिल्याने केरकर यांनी उपोषण स्थगित केले. महिला दिनी मच्छि विक्रेत्या महिलांना न्याय मिळाल्याची भावना यावेळी डॉ. केरकर यांनी व्यक्त केली.

क्यार वादळातील नुकसान ग्रस्तांसाठी रुपये सहा हजार सानुग्रह अनुदान जाहीर केले होते मात्र जिल्ह्यातील वादळात नुकसानी झालेल्या अनेक मच्छिमार महिला अद्यापही या अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत. ही बाब निवेदनाद्वारे निदर्शनास आणून डॉ. जितेंद्र केरकर यांनी महिला दिनी उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर त्यांनी उपोषण छेडले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक महिला सहकारी संस्थेच्या सौ. स्नेहा केरकर, प्रियांका तारी, लक्ष्मण तरी यांच्यासह कोळंब, सर्जेकोट, तारकर्ली देवबाग, आचरा येथील मत्स्य विक्रेत्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांनी सानुग्रह अनुदान वाटपाबाबत माहिती दिली. लहान मासळी विक्रेता मच्छिमारांना दोन शितपेटी पुरवठा या घटकाखाली जिल्ह्यातील एकूण ४५८६ महिलांना प्रती महिला ६०००/- नुसार रु. २.७५ कोटी अनुदान मंजूर करून वितरीत करण्यात आले आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्यव्यावसायिक महिला विविध सेवा सहकारी संस्था मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेच्या एकूण १४०२ महिलांना प्रती महिला रु. ६०००/- नुसार रु. ८४.१२ लक्ष अनुदान मंजूर करून वितरीत करण्यात आले आहेत. तसेच या संस्थेच्या देवगड येथील सभासदांचे १४२ महिलांचे प्रती महिला रु. ६०००/- नुसार रु. ८.५२ लक्ष अनुदान खाती जमा करण्यासाठी बँकेत धनादेश सादर करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्यव्यावसायिक महिला विविध सेवा सहकारी संस्था मर्या. सिंधुदुर्ग संस्थेच्या विक्रेता लाभार्थीचे उर्वरित परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच त्वरित अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देत आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती राजम यांनी केरकर यांना लेखी पत्रद्वारे केली. त्यामुळे केरकर यांनी उपोषण स्थगित केले.

You cannot copy content of this page