वैद्यकीय अधिकारी डॉ आरती देसाई
बांदा/प्रतिनिधी
शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या विद्यार्थिनींना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान व आरोग्य विषयक माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती देसाई यांनी केले.
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त खेमराज महाविद्यालयात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. देसाई बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रोटरॅक्ट क्लबची महिला सक्षमीकरण चेअरमन अंजली सावंत, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, खजिनदार गार्गी विर्नोडकर, साईस्वरूप देसाई, अक्षय कोकाटे, मुईन खान आदी उपस्थित होते. प्रशालेच्या शिक्षिका रश्मी नाईक देखील उपस्थित होत्या.
मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर डॉ. देसाई यांनी माहिती दिली. या उपक्रमांमुळे अज्ञानाचा पडदा दूर होऊन मुली सबळ होतील, असे प्रतिपादन अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी केले.
प्रास्तविकात अंजली सावंत हिने वयक्तिक स्वच्छता व मासिक पाळी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
