वंचित सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर यांची विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्याकडे मागणी
बांदा/प्रतिनिधी
शेर्ले तेरेखोल नदीपर्यंत जाणारी शिरोड-बांदा बसफेरी गेले काही वर्षे नदीपर्यंत नेण्याचे बंद केल्याने याचा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याने वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी कणकवली विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव यांची भेट घेत बस तात्काळ सुरु करण्याबाबत निवेदन दिले. सदरील बस फेरी बरोबरच सातार्डा बस फेऱ्याही येत्या दोन दिवसात पूर्ववत शेर्ले नदीपर्यंत जाणार असल्याचे सांगून तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.
याबाबतचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाच्या कणकवली विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव यांना तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी दिले. यावेळी जिल्हा वाहतूक पर्यवेक्षक भगवान धुरी, वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, पत्रकार रामदास जाधव आदी उपस्थित होते.
सदर निवेदनामध्ये शेर्ले जुन्या कापई पुलावरील वाहतूक बंद झाल्यापासून शिरोडा बांदा या बसफेऱ्या शेर्ले पावसकर दुकान ते शेर्ले नदीपर्यंत नेण्याचे बंद करण्यात आले. याचा फटका गेले कित्येक वर्षे या भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशी वर्गाला बसत असल्याने व ग्रामस्थांची मागणी असल्याने म्हटले आहे. परिवहन विभागानेही समस्या लक्षात घेत शिरोडा बांदा बसफेऱ्या बरोबरच पाडलोस सातार्डा, व सतोसे या फेऱ्याही शेर्ले पावसकर दुकान ते नदीपर्यंत जातील असे सांगून लागलीच सावंतवाडी व वेंगुर्ले आगार प्रमुखाना तसे आदेश दिलेत. संबंधित आगार प्रमुखानी येत्या दोन दिवसात बस पाठविण्यात येण्याचे सांगितल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिवहन विभागाचे आभार व्यक्त करण्यात आलेत.
फोटो:-
शिरोडा बांदा बस फेरी शेर्ले नदीपर्यंत जाण्याबाबत कणकवली विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव यांना निवेदन सादर करताना तालुका अध्यक्ष विजय शेर्लेकर. बाजूला जिल्हा वाहतूक पर्यवेक्षक भगवान धुरी, वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, पत्रकार रामदास जाधव.
