शल्य चिकित्सक डॉ बी एस नागरगोजे
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: सरोगसी नियमन कायदा 2021 व सहायक प्रजनन नियमन कायद्यातर्गंत नवीन केंद्र धारकांनी तसेच ज्या केंद्रांची पूर्व नोंदणी पीसीपीएनडीटी कायद्यातर्गंत होती त्यांनी नॅशनल रजिस्ट्री पोर्टलवर https://registry.artsurrogacy.gov.in/ वर नोंदणी करणे
बंधनकारक आहे त्यानुसार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.नागरगोजे यांनी केले.
गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लींग निवडीस प्रतिबंध कायदा 1994) सल्लागार समितीची बैठक आज झाली. बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. राजेश नवांगुळ, सचिन परुळकर, डॉ. सतीश पवार उपस्थित होते.
वकील दिमख धुरी यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. गर्भलिंग निदान करणे हा पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.गर्भलिंग निदान करणाऱ्यास तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा व दहा हजार रुपये पर्यंत दंड याबाबतची तरतूद कायद्यामध्ये आहे.जर कोणतीही व्यक्ती, डॉक्टर गर्भलिंग निदान करीत असल्यास तात्काळ त्याबाबतची तक्रार जवळच्या ग्रामीण किंवा उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालय येथे करावी. तसेच हेल्पलाइन क्रमांक 1800 233 4475 वरही नोंद करू शकता,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी केलेले आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत तीन सोनोग्राफी केंद्रांमध्ये मशीनच्या प्रात्यक्षिकासाठी परवानगी देण्यात आली.
सावंतवाडी येथील चितारी हॉस्पिटल अॅन्ड क्रिटिकल केअर केंद्राचा नोंदणी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सरोगसी नियमन कायदा 2021 व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायदा 2021 याबाबत चर्चा करण्यात आली.पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत सर्व वैद्यकीय अधीक्षक यांनी केलेल्या तपासणीचा आढावाही घेण्यात आला.
००००००
