मालवण दि प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील धामापूरच्या सरपंच मानसी परब यांच्या संकल्पनेतून धामापूर ग्रामपंचायत, कोकण कला शिक्षण विकास संस्था आणि ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने धामापूर ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये ७५ जणांची आरोग्य तपासणी, तर ८५ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. नेत्र तपासणीत ज्यांना चष्मे लागणार आहेत, त्या ३३ लाभार्थ्यांना सरपंच मानसी परब स्वखर्चाने चष्मे उपलब्ध करून देणार आहेत.
तत्पूर्वी, सरपंच परब यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ झाला. उपसरपंच रमेश निवतकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, मानसी धामापूरकर, पार्वती धामापूरकर, शंकर धामापूरकर, सामाजिक कार्यकर्ते महेश धामापूरकर, महेश परब, रवींद्र कदम, प्रशांत गावडे, जयश्री थवी साक्षी नाईक, तेजस्विनी भोसले आदी उपस्थित होते.
