भाजी घ्या भाजी… लाडू घ्या… वडापाव घ्या… पुरणपोळी घ्या…

मालवणच्या भंडारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी भरविलेल्या आठवडा बाजारात मजा, मस्तीची धूम

⚡मालवण ता.१९-: भाजी घ्या भाजी… लाडू घ्या… वडापाव घ्या… पुरणपोळी घ्या… अशा आरोळ्या देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत मालवण येथील भंडारी ए सो प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या मैदानावर भरलेल्या आठवडा बाजारात आपल्याकडील मालाची विक्री केली. मजा मस्ती आणि गंमत जंमत करीत विविध वस्तूंची विक्री करताना नकळतच विद्यार्थ्यांनी विक्री कौशल्य व आर्थिक व्यवहाराचे धडेही गिरवले. भंडारी ए सो प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे पालकांसह सर्वांनीच कौतुक केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या वतीने गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजार हा उपक्रम राबविला जात आहे. दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार कौशल्य, हिशेब, पैशांची हाताळणी, देवाणघेवाण व विक्री कौशल्य आदी गोष्टींचे विद्यार्थ्यांना बालवयातच ज्ञान मिळावे या दृष्टीने हा उपक्रम राबविला जातो. यावर्षीही हा प्रशालेच्या मैदानावर या आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांच्या मदतीने विविध वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, अंडी, पुरणपोळी, वडापाव, विविध प्रकारचे लाडू, शेंगदाणे, कुरकुरे आदी खाद्य पदार्थ तसेच विविध शितपेये, पाणी बॉटल आदी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीला ठेवल्या होत्या. यामध्ये त्यांना पालक व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा शुभारंभ मालवणच्या भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वामन खोत यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून झाला

विद्यार्थ्यांच्या या आठवडा बाजारास भंडारी हायस्कुल मधील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शहरातील नागरिकांनी भेट देऊन वस्तूंची खरेदी केली. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा कांबळी, हायस्कूलचे शिक्षक आर डी बनसोडे, श्रीमती मेस्त्री , सौ ए ए वाईरकर, सुनंदा वराडकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.भुपेश गोसावी, सौ. राधा दिघे , महेश लोकेगावकर,पूर्वी गोसावी आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page