मालवण (प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला देण्याचा निर्णय दिल्याने मालवण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरड नाका येथे फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला.
शिवसेना पक्षावरून उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज रात्री ८ वाजता मालवणातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भरड नाका येथे जमत फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला. हर हर महादेव… बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… शिवसेनेचा विजय असो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक बबन शिंदे, जिल्हा सरचिटणीस किसन मांजरेकर, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, सोनाली गावकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, सौ. घारकर आदी व इतर उपस्थित होते.
