मालवण (प्रतिनिधी)
मालवण बंदर जेटी परिसरातील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मालकीच्या वाहनतळ जागेतील दुकान, स्टॉल, नौका आदी अतिक्रमणे येत्या चार दिवसात हटविण्यात यावीत अशा आशयाच्या नोटीसा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या आदेशान्वये मालवण बंदर विभागाने स्टॉल धारक व इतर अशा एकूण २३ जणांना बजावल्याने खळबळ उडाली असून येत्या चार दिवसात अतिक्रमणे न हटविल्यास अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत ही अतिक्रमणे हटविण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही बंदर विभागाने दिला आहे.
दरम्यान, बंदर जेटी परिसरातील स्टॉल हटविण्याच्या नोटीसा यापूर्वीही अनेकवेळा बंदर विभागाने स्टॉल धारकांना बजावल्या होत्या. स्टॉल धारकांना पर्यायी जागा देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने स्टॉल धारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मालवण बंदर जेटी परिसरात तसेच बंदर विभागच्या मालकीच्या वाहनतळ जागेत स्थानिकांनी विविध स्टॉल उभारले आहेत. बंदर विभागाच्या जागेत स्टॉल धारकांना जागा देण्याबाबत कोणतीही तरतूद नसल्याने हे स्टॉल अनधिकृत आहेत. मात्र यावर अनेकांचा रोजगार अवलंबून असल्याने हे स्टॉल हटविण्याबाबत बंदर विभागाने कधीही कारवाई केलेली नाही. तरी सदर जागेतील स्टॉल व अतिक्रमणे हटाविण्याबाबत बंदर विभागाने अनेकवेळा नोटीसा बजावलेल्या आहेत. याबाबत पुन्हा नोटीसा बजावल्या असून मेरीटाईम बोर्डाच्या मालकीच्या असणाऱ्या या जागेला कंपाउंड वॉल व गेट बसविण्यात येणार असल्याने चार दिवसात या जागेतील स्टॉल, दुकाने, नौका हटविण्यात यावेत असे बंदर विभागाने नोटीसीत म्हटले आहे. अन्यथा बंदर विभागाकडून ही अतिक्रमणे हटविण्यात येतील असा इशारा मालवण बंदर निरीक्षकांनी दिला आहे.
दरम्यान, बंदर विभागाच्या नोटीसी बजावण्यावरून यापूर्वी स्टॉल धारक व बंदर विभागामध्ये वाद झाले आहेत. स्टॉल हटविल्यास यावर अवलंबून असलेल्या स्टॉल धारक व्यवसायिकांचा रोजगारावर परिणाम होणार आहे. स्टॉल धारकांना पर्यायी जागा देण्याबाबतही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामध्ये जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ या संस्थेने मध्यस्थी करत बंदर विभागाच्या सहकार्याने स्टॉल धारकांसाठी रेडिमेड स्टॉल उपलब्ध केले आहेत. मात्र ते कार्यान्वित करण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशातच आता बंदर विभागाने पुन्हा स्टॉल हटविण्याच्या नोटीसा बजावल्याने स्टॉल धारक हवालदिल झाले आहेत.
