कुणकेश्वर यात्रेसाठी मालवण आगार सज्ज

मालवण व आचरा येथून २० गाड्यांचे नियोजन ;मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती

⚡मालवण ता.१७-: देवगड येथील श्री कुणकेश्वर यात्रा उद्या दि. १८ फेब्रुवारी रोजी होत असून यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मालवण एसटी आगारातून कुणकेश्वर यात्रा जादा वाहतूकीसाठी मालवण व आचरा येथून २० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.

कुणकेश्वर यात्रेसाठी मालवण बसस्थानकावरुन पहाटे ५ वाजल्यापासून १० गाड्या, तसेच पहाटे ६ वाजल्यापासून आचरा कुडोपी बांदिवडे भगवंतगड मसुरे तळाशिल वायंगणी हिर्लेवाडी येथून ४ गाड्या, आडबंदर मुणगे हिंदळे येथून २ गाड्या, मिठबाव, तांबळडेग, कातवण व मोर्वे येथून प्रत्येकी १ गाडी अशा प्रकारे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मार्गस्थ बिघाडासाठी रा. प. महामंडाळाचे फिरते दुरुस्ती पथक ठेवण्यात येणार आहे. यात्रा सोमवार दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत चालू असल्याने जादा गाड्या दि. २० रोजी ५ वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.

कातवण ऐवजी कुणकेश्वर एमटीडीसी पटांगणावर सोय

कुणकेश्वर येथील कातवण बस स्थानक हे जिल्हा प्रशासन व कुणकेश्वर विश्वस्त मंडळ यांच्या सुचनेनुसार कातवण रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये याकरीता व भाविकांच्या सोयीसाठी कुणकेश्वर एमटीडीसी पटांगण येथे करण्यात आले आहे. याची प्रवाशी भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सचेतन बोवलेकर यांनी केले आहे.

चालक वाहक यांना भाविकांशी सौज्यन्याची व सहकार्याची वागणूक देण्याची सुचना देण्यात आली आहे. बसस्थानकावर येणारा भविक प्रवाशी वर्ग हा बाहेरुन तसेच परगावातून येणार असल्याने उद्घोषण यंत्रणेमार्फत चोरांपासून सावधान व आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात इ. सुचना प्रसारीत करण्यात येणार आहेत. जादा वाहतूकीच्या गाड्यांतून ७५ वर्षावरील अमृत जेष्ठ नागरीक यांना १००%, ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांना ५०% तसेच अंध, अपंग व इतर सर्व सवलती देण्यात येणार आहेत. वाहतूक करण्यात येणाऱ्या सर्व रा. प. गाड्या सुस्थितीत व स्वच्छ असतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. तरी प्रवाशी भाविकांनी एसटी बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सचेतन जयराम बोवलेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page