३ बसेसची व्यवस्था:पोलिस बंदोबस्त ठेवणार…
आंबोली,ता.१७: येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आंबोली ग्रामस्थांनी तयारी केली आहे.विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली हिरण्यकेशी हे जागृत तीर्थस्थान आहे.या ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम सातव्या गुहेत असून शिवलिंग आणि गंगा देवीची आणि श्री गणेशाची मूर्ती आहे.हे प्राचीन देवस्थान आहे.
या ठिकाणी जलकुंड आहे त्यात स्नान केले जाते.हे स्थान देखील काशी क्षेत्राप्रमाणे असल्याने या ठिकाणी अस्थी विसर्जन देखील केले जाते. शिव महिमा असल्याने शिव स्थान म्हणून या ठिकाणी भावीक मोठ्या श्रद्धेने येतात.महाशिवरात्री निमित्त या वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गावकऱ्यांनी केले आहे.पहाटे ५ वाजता आरती,त्यानंतर भाविकांचे नारळ,ओटी ठेवणे,नवस फेडणे,गाऱ्हाणी,असा कार्यक्रम आहे.रात्री भजन कीर्तन चा कार्यक्रम ,दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य,देव स्नान असा कार्यक्रम आहे.त्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी एस टी महामंडळाच्या 3 बसेस आंबोली बस स्थानकातून सोडण्यात येणार आहे असे आगार वेवस्थापक बिपीन प्रभू यांनी सांगितले.या ठिकाणी मुख्यालय कंट्रोल वरून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.सावंतवाडी पोलिसांनी पाहणी करून बंदोबस्त मागितला आहे. खाजगी गाड्या आणि रिक्षा व्यावसायिक सज्ज आहेत.यावर्षी मोठी गर्दी होणार असल्याचे एकंदरीत अंदाज आहे.
