⚡मालवण ता.३०-:
मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिरातील श्री देवी जुगाईच्या त्रैवार्षिक मांडास आज अपूर्व उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दिनांक ११ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या मांड उत्सवास विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट होणार असून दिनांक १ जानेवारी दुपारी तीन वाजल्यापासून ओटी भरण्याचा तर दिनांक ९ जानेवारी रोजी होणाऱ्या दीपोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव वेताळ, सातेरी, रवळनाथ, पावणाई, लिंग आदी देवस्थान ट्रस्ट पेंडूर यांनी केले आहे.
पेंडूर गावाचा ऐतिहासिक मांड उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यामागे रंजक कथाही सांगितली जाते. पेंडूरचे ग्रामदैवत श्री देव वेताळाची बहीण श्री देवी जुगाई ही असून दर एक वर्षाआड स्वतः श्री देव वेताळ हा आपल्या बहिणीला १४ दिवसांसाठी माहेरपणाला घेऊन येतो. श्री देवी जुगाई १४ दिवस माहेरी राहते आणि तिच्या या माहेरपणाचा काळ म्हणजे मांड उत्सव होय. या उत्सवाच्या दिवशी सर्व मानकरी, ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात गावात जातात आणि तेथील एका स्त्रीच्या अंगात श्री देवी जुगाईचा संचार होतो असे म्हणतात. त्यानंतर श्री देव वेताळ स्वतः आपल्या बहिणीचा हात धरून ढोल ताश्यांच्या गजरात आणि मिरवणुकीने तिला माहेरी म्हणजेच स्वतःच्या मंदिरात घेऊन येतो. श्री देवी जुगाई मंदिरात आल्यानंतर प्रथम पाटावर ओटी भरून तिची पूजा केली जाते आणि यानंतर उत्सवाला प्रारंभ होतो.
या परंपरेनुसार आज दुपारी मानकऱ्यांनी श्री देव वेताळाला कौल लावल्यानंतर कौलाद्वारे होकार मिळताच बारापाच मानकरी व ग्रामस्थांनी पेंडूर खरारेवाडी गावात जाऊन देवी जुगाईचा अवसर येणाऱ्या माहेरवाशीनीस आणण्यासाठी प्रस्थान केले. खरारे वाडी येथे गेल्यानंतर रीतिरिवाजानुसार मानपानाचा कार्यक्रम पार पडला. . हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पाच वाजता श्री देव वेताळ श्री देवी जुगाईला घेऊन मंदिरात पोहोचल्यानंतर एकच जयघोष झाला. रात्री भजन आणि दिंडीचा कार्यक्रमही पार पडला.
या उत्सवाच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी पाच मानकरी आणि १२ सेवक यांनी ओट्या भरल्यानंतर देवाच्या हुकुमावरून अन्य भाविकांच्या ओट्या भरण्यास सुरुवात होणार आहे.
या उत्सवानिमित्त श्री वेताळ मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आरास करून सजविण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. या उत्सवासाठी महाराष्ट्र भरातून भाविक येत असून माहेरवाशिणीही गावात दाखल झाल्या आहेत.
यानिमित्त दि. ३० डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंत रोज रात्री ९ वा. भजनाचा कार्यक्रम तसेच रात्री १०.३० वा. दिंडी सोहळा होणार आहे. दि.१ जानेवारी दुपारी ३ वाजल्यापासून ओटी भरणे, दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत लक्ष्मी नारायण ढोल पथक, वालावल याचे ढोल वादन होणार आहे. दि. ९ रोजी प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर व त्यांचे सहकारी यांचे रांगोळी प्रदर्शन आयोजित केले असून रात्री ९.३० वा. दीपोत्सव सोहळा व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. दि. १० रोजी रात्री ८ ते ९.३० या वेळेत न्यू इंग्लिश स्कुल पेंडूर च्या विद्यार्थ्यांची योगासने प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तर दि. ११ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वा. श्री गणेश माऊली पाताळेश्वर ढोल पथक, चेंदवण यांचे वादन होणार असून रात्री देवीचा गोंधळ होणार आहे. या मांड उत्सवात भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळ व बारापाच मानकरी, पेंडूर यांनी केले आहे.
