डंपरमालकांना महसूल प्रशासनाने बजावल्या नोटीसा
⚡मालवण ता.३०-: मालवण महसूल प्रशासनाने शुक्रवारी आचरा व बेळणे मार्गावर अनधिकृतपणे चिरा व खडी वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. याप्रकरणी संबधित डंपरमालकांना महसूल प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.
आचरा तिठा येथे महसूल प्रशासनाने सकाळी साडे सात वाजता डंपरचालक संतोष जानू खरात याच्या ताब्यातील डंपर (एम. एच. ०७ सी. ५४१९) पकडला. या डंपरमध्ये दोन ब्रास जांभा दगड सापडला. मंडळ अधिकारी अजय परब, तलाठी एस. एन. जाधव, योगेश माळी यांच्या पथकाने हि कारवाई केली. तर बेळणे मार्गावर सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नवनाथ पवार (बोर्डवे कणकवली) यांच्या मालकीचा आणि डंपर चालक किसन शंकर जाधव याच्या ताब्यातील डंपर (एम. एच. ०७ ए. जे. २७०५) महसूलच्या पथकाने पकडला. या डंपरमध्ये दोन ब्रास खडी सापडली. तहसीलदार श्रीधर पाटील मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने हि कारवाई करण्यात आली. या दोन्ही डंपर चालकांकडे खडी व जांभा दगड वाहतुकीबाबत कोणताही परवाना न सापडून आल्याने हे दोन्ही डंपर महसूल प्रशासनाने ताब्यात घेऊन हे डंपर तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आले होते.
