पाच दिवस चालणार जत्रोत्सव
⚡मालवण ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंड्याची जत्रा म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या चिंदर येथील श्री देवी भगवती माऊलीच्या जत्रोत्सवास आज सकाळपासून मोठ्या उत्साहात आणि भगवती देवीच्या नामघोषात प्रारंभ झाला. यावेळी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करत दर्शनाचा लाभ घेत नवस बोलले व फेडले. हा जत्रोत्सव पाच दिवस चालणार असून यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली मंदिरात सकाळी बारा पाच मानकरी जमून देवीला गाऱ्हाणे घालून देवीला साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली. त्यानंतर बारा पाच मानकऱ्यांचे नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आले. यानंतर भाविकांचे नवस फेडणे ओटी भरणे आदी इतर धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात करण्यात आली.
भगवती माऊली मंदिरात सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनाला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी देवस्थान मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदरचे सर्व पदाधिकारी आदी विशेष परीश्रम घेत होते. रात्रौ उशिरा ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांचे तरंगांचे भगवती मंदिराकडे आगमन झाल्यावर जत्रोत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या जत्रोत्सवात ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात कनगी विक्री साठी येत असल्याने भगवती माऊलीच्या
जत्रोत्सवास कनग्याची यात्रा म्हणूनही ओळखली जाते. या जत्रोत्सवाच्या व्यवस्थेसाठी चिंदर ग्रामपंचायत कडूनही विक्रेत्यांना लाईट, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या सोईसाठी रस्त्याची डागडुजी करून रस्त्यांवर पाणी मारुन व्यवस्थित करण्यात आले होते. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवाला पाचही दिवस भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.
या जत्रेनिमित्त गुरुवारी ८ डिसेंबरला संध्याकाळी ५.३० ते ६.३० श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, देऊळवाडीचे सुस्वर भजन, रात्रौ ६.३० ते ७.३० वा. श्री देव तेरई ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ तेरईचे सुस्वर भजन, रात्री ७.३० ते ८.३० वा. श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, साटमवाडीचे सुस्वर भजन, रात्री ९ नंतर- पुराण, गोंधळ, किर्तन व श्रीं ची आरती, शुक्रवार ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ५ वा. श्री सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळचे सडेवाडीचे सुस्वर भजन, संध्या. ५.३० ते ६.३० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकरवाडीचे सुस्वर-भजन, संध्या ६.३० ते ७.३० वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, कुंभारवाडीचे सुस्वर भजन, रात्री ७.३० ते ८.३० वा. श्री देव वाडत्रीब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, कोंड-अपराजवाडीचे सुस्वर भजन, रात्रौ ९ नंतर पुराण, गोंधळ, किर्तन व श्री ची आरती, शनिवारी १० डिसेंबरला संध्या. ५.३० ते ६.३० वा. श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, लब्देवाडीचे सुस्वर भजन, संध्या. ६.३० ते ७.३० वा. – श्री देवी पावणाई प्रासादिक भजन मंडळ खरिवाडीचे सुस्वर भजन, ७.३० ते ८.३० श्री आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडीचे सुस्वर भजन, भजन पुराण, गोंधळ, किर्तन व श्रीं ची आरती. रविवारी ११ डिसेंबरला दुपारी ३ ते ६ वा. – चालू वहिवाटदार सर्व महिला जानकी / किशोरी / रंजना घाडी यांच्या मार्फत आयोजित हळदीकुंकू समारंभ, संध्या ६ ते ७ वा. श्री देव पिसाळी ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, तेरईचे सुस्वर भजन, रात्रौ ७ ते ८ वा. – श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ, चिंदर भटवाडीचे सुस्वर भजन,
रात्री १० वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा “पतिव्रता नारी देवांना भारी” हा नाट्य प्रयोग व रात्रौ २.३० नंतर पुराण-गोंधळ-किर्तन व श्री ची आरती दिवट्या नृत्यासहित-लळीत समाप्ती असे कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारापाच मानकरी, देणगीदार, हितचिंतक, सर्व ग्रामस्थ व श्री देव भगवती माऊली सेवा समिती, चिंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
