मालवण बाजारपेठेतून मोटासायकल चोरीस

चोरटा बाजारपेठेतील पोलीसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद;पोलिसांकडून अधिक तपास सुरू

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असून आज दिवसाढवळ्या शहरातील मशीद गल्ली येथे उभी करून ठेवण्यात आलेली वसीम खान यांची हिरो एचएफ ड्यूलक्स ही मोटरसायकल दुपारी चोरीला गेली आहे. मोटरसायकल नेताना चोरटा बाजारपेठेतील पोलीसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मालवण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत वसीम खान यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. वसीम खान यांनी आपली हिरो एचएफ ड्यूलक्स (क्रमांक- एचएम ०७ एएम १९४९) ही मोटारसायकल आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मशीद गल्ली येथील मशिदीसमोर चावी काढून उभी करून ठेवली होती. मात्र सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना मोटरसायकल दिसून आली नाही. शोधाशोध करूनही मोटरसायकल न सापडल्याने त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली.

दरम्यान, वसीम खान यांची मोटरसायकल चोरणारा बाजारपेठेतील पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मशिदीकडून बाजाराच्या दिशेने मोटारसायकल घेऊन जाताना सदर चोरटा दिसत आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चोरट्याची ओळख पटविण्याबाबत व शोध घेण्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page