नट वाचनालयाचे २४ डिसेंबर रोजी आयोजन
बांदा/प्रतिनिधी
मुलांमध्ये आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे, त्यांच्यात शालेय नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी येथील नट वाचनालयाच्या वतीने (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित ‘नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक २४ रोजी सकाळी १० वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे हे अठरावे वर्ष आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवी या प्राथमिक गटातून २ स्पर्धक व इयत्ता आठवी ते दहावी गटातून २ स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. प्राथमिक गटासाठी वेळ ४ मिनिटे असून यासाठी ‘माझा आवडता लेखक किंवा लेखिका’, मला आवडलेली स्वामी विवेकानंदांची गोष्ट’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. माध्यमिक गटासाठी ५ मिनिटे वेळ असून यासाठी ‘अमृतमहोत्सवी वर्षातील माझा भारत’, ‘क्रांतिकारक – विनायक दामोदर सावरकर’ हे विषय ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेमध्ये कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करावयाचे आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धक शाळांनी आपले प्रवेश अर्ज २० डिसेंबर पूर्वी ग्रंथपाल, नट वाचनालय, बांदा यांच्याकडे पोहोचतील असे पाठवावेत. स्पर्धेदिवशी आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेत आपल्या शाळेचे स्पर्धक पाठवून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
