सुनील राऊळ;रायझिंग डे निमित्त ११ व १८ डिसेंबर रोजी आयोजन
⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली रायझिंग डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आला असून यात मॅरेथॉन स्पर्धा ही ११ डिसेंबर रोजी तर १८ डिसेंबर रोजी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे केले गेले आहे. यासाठी आकर्षिक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती आंबोली सैनिक स्कूलचे व्यवस्थापक सुनील राऊळ यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेसाठी विजेत्यांना रोख रकमेसह पारितोषिकी देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा ११ डिसेंबरला येथील भोसले उद्यान परिसरातून सकाळी ७:०० वा. सुरू होणार आहे. तसेच कोरोना काळात काम करताना जीव गमवावा लागलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून आरोग्याचा संदेश देणारी १८ डिसेंबरला सायकल रॅली सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत जिल्हाभरातून सायकलस्वार सहभागी होणार आहेत.ही रॅली सावंतवाडीतून आंबोलीच्या दिशेने जाणार आहे.
यात दीडशे ते दोनशे सायकल स्वार सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जिल्ह्यासह गोवा व रत्नागिरीतून सुद्धा स्पर्धक सहभागी होणार आहेत. तरी ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९४२०१९५५१८ / ७८२२९४२०८१ या नंबर वर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, तसेच संस्थेच्या माध्यमातून जाहीर केलेल्या बारकोडवर सुद्धा ऑनलाइन नाव नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
