Headlines

मत्स्य संपदा योजनेंतर्गत लाभार्थ्यांची वाटचाल उत्साह वाढविणारी- रत्नाकर राजम

⚡मालवण ता.२३-: भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य निर्यातदार देश असून देशात मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीला अजून खूप मोठा वाव आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना त्यादृष्टीने महत्वाची ठरते आहे. सिंधुदुर्गात मत्स्य संपदा योजनेंतर्गत विविध लाभार्थ्यांची सुरू असलेली वाटचाल नक्कीच इतरांचा उत्साह वाढविणारी आहे, असे प्रतिपादन प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नाकर राजम यांनी येथे केले.

मालवण दांडी येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक मच्छीमार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मच्छीमारांना पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतील विविध तरतुदींची माहिती मत्स्य अधिकार विजय देवकर, बहर महाकाळ यांनी दिली.

यावेळी प्रभारी मत्स्यविकास अधिकारी रवींद्र मालवणकर, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप सुर्वे, यांत्रिकी निर्देशक अनिकेत बोधले, मालवण मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर, मत्स्य विक्रेता प्रतिनिधी दिक्षा ढोके, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, रोझरी सोसायटीचे प्रतिनिधी नरोन्हा, रामेश्वर सोसायटी प्रतिनिधी सतेजा सारंग आदी उपस्थित होते.

यावेळी मत्स्य विभागाने सादर केलेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजना लाभार्थीची यशोगाधा या चित्रफितीचे कौतुक चोपडेकर यांनी केले. या चित्रफितीमुळे नक्कीच इतरांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी केले.

You cannot copy content of this page