दोघे ताब्यात: पो नि शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीच्या विरोधात दोन कारवाया करत तब्बल ८ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवायात दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पहिली कारवाई बांदा बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पुलाखाली आहे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. नारायण विठ्ठल ठाकर (वय ५५, रा. बांदा जुना स्टॅन्ड ) हे मोठ्या पिशवीतून गोवा बनवटीच्या दारूचा खोक्याची पायी चालत वाहतूक करत होते. पोलिसांनी झडती घेत गोवा बनावटीचा नॅशनल कमांडर ट्रिपल एक्स ब्रँडचा २ हजार ४०० रुपये किमतीचा एक खोका जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी ठाकर याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.
दुसरी कारवाई पहाटे ६ वाजता बांदा वाफोली रस्त्यावर महाराष्ट्र गॅरेज जवळ करण्यात आली. गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने स्विफ्ट मोटारीतून (एमएच ०७ एजी ७८०१) गोवा बनवटीची वाहतूक होत होती. पोलिसांनी मोटारीची थांबवून तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा आढळला. पोलिसांनी गोवा बनवटीच्या विदेशी मद्याचे रिझर्व रेअर व्हिस्कीचे ३ हजार ६०० रुपये किमतीचा एक खोका, गोल्डन एसी ब्ल्यूफाईन व्हिस्कीचे ९३ हजार ६०० रुपये किमतीचे १८० मिली मापाचे २५ खोके, गोल्डन एसी ब्ल्यू फाईन व्हिस्कीचे ९९ हजार रुपये किमतीचे ७५० मिली मापाचे २५ खोके अशी एकूण १ लाख ९६ हजार २०० रुपये किमतीची दारू व ७ लाख रुपये किमतीची मोटार जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोपाळ सुरेश गावडे (वय ३४, रा. नेनेवाडी, चौकुळ, ता. सावंतवाडी) याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.
दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक शामराव काळे, कर्मचारी राजू शेळके, विजय जाधव, बाळू गवस, ज्ञानेश्वर हळदे यांच्या पथकाने केली.
