गुवाहाटीतील आर्मीच्या इव्हेंटसाठी कणकवलीचे संजय पेटकर कोरिओग्राफर

⚡कणकवली ता.२०-: इंडियन आर्मीच्यावतीने आसाम राज्यातील गुवाहाटी येथे पूर्वोत्तर स्वाभिमान उत्सव २१ नोव्हेंबरला संपन्न होत आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या नृत्यविषयक कार्यक्रमांसाठी प्रतिथयश नृत्यदिग्दर्शक, कणकवली पत्रकार समितीचे सदस्य संजय पेटकर यांची सहाय्यक कोरिओग्राफर म्हणून निवड झाली आहे. श्री. पेटकर हे सध्या गुवाहाटी येथे देवेंद्र शेलार यांच्यासमवेत कार्यक्रमांतील कलाकारांना नृत्याविष्कारात अंतिम टप्प्यातील मार्गदर्शन करीत आहेत.

उत्सवामध्ये ड्रोन शो, भारतीय सैन्याचा वेपन्स डिस्प्ले, स्काय डायविंग शो तसेच जुबीन गर्ग, प्रियंका भराली या नामवंत गायकांचे गायनही होणार आहे. सोबत आर्मी स्कूलचे ८०० विद्यार्थी, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, नागालँड या राज्यांचे लोकनृत्य कलाकार यांचा पारंपरिक नृत्यप्रकारही होणार आहे. यामध्ये आसामचा पूर्वइतिहास व आतापर्यंतची वाटचाल सादर केली जाणार आहे.

सदरच्या उत्सवासाठी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, मेजर जनरल आर. के. झा, लेफ्टनंट जनरल के. सी. पंचनाथन यांच्यासह आठ राज्यांचे मुख्यमंत्री, आर्मीचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री. पेटकर यांनी यापूर्वी रशिया येथील फ्रेंडशीप फेस्टिव्हल, चीन, कोरिया, मंगोलिया, मॉरिशस, स्वित्झर्लंड येथील देशांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरण व दिग्दर्शन केले आहे. ते मुंबईतील नामवंत नृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांच्या टिममधून सदर उत्सवात सहभागी होत आहेत. श्री. शेलार यांनी यापूर्वी कॉमनवेल्थ एशियन गेमसारख्या मोठ्या स्पर्धेतही नृत्य कार्यक्रमांची ग्राऊंड कोरियोग्राफी केली होती, त्या टिममध्येही पेटकर यांचा समावेश होता. शेलार यांनी भारतात, भारताबाहेरील मोठ मोठ्या इव्हेंट कंपन्यांसोबत काम केले आहे. ते मूळ कोकणचेच ( जि. रत्नागिरी) सुपुत्र आहेत. त्यांच्यासोबत काम करणे ही आपणासाठी पर्वणीच असल्याचे पेटकर यांनी सांगितले. तर अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात नृत्यदिग्दर्शनाची संधी मिळाल्याबाबत पेटकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page