शिक्षकाला अचानक कामगिरी: पळसंब ग्रामस्थ आक्रमक

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी भेट घेत “त्या” शिक्षकाला आणले परत शाळेत

मालवण (प्रतिनिधी)

जि. प. केंद्रशाळा नं. १ पळसंब येथे समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकाची शिक्षण विभागाने अचानक आदेश काढत मसुरे केंद्रशाळा नं. १ येथे कामगिरी शिक्षक म्हणून नियुक्ती केल्याने आक्रमक बनलेल्या पळसंब ग्रामस्थांनी आज मालवण पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर व गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी भेट घेऊन जोपर्यंत शाळेला पदवीधर शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत पंचायत समितीमधून हलणार नाही असा इशारा दिला. अखेर गटविकास अधिकारी गुजर व शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या चर्चेनंतर शिक्षण विभागाने कामगिरी. शिक्षकाचा काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या वादावर पडदा पडला.

शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मधील संचमान्यतेनुसार केंद्रशाळा मसुरे न. १ चे पदवीधर शिक्षक विनोद रामचंद्र कदम यांचे समायोजन जि. प. प्राथमिक शाळा पळसंब न. १ येथे करण्यात आले असताना शिक्षण विभागाने आदेश काढून विनोद कदम यांना केंद्रशाळा मसुरे न. १ येथे कामगिरी शिक्षक म्हणून नियुक्त केली. त्यामुळे याबाबत आज पळसंब ग्रामस्थांनी आज दुपारी पंचायत समिती येथे धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत, सोसायटी संचालक रविराज परब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश मुणगेकर, सुभाष पळसंबकर, पिंट्या सावंत आदि उपस्थित होते.

गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करताना चंद्रकांत गोलतकर म्हणाले, सलग दोन वर्षे पळसंब न. १ मध्ये पदवीधर शिक्षक मंजूर असतानाही शाळा २ उपशिक्षक चालवत आहेत. त्यामुळे शाळेचे सलग दोन वर्षे नुकसान सहन करत आहोत याचा परिणाम पटसंख्येवर होऊन इयत्ता सातवीच्या वर्गातील दोन विद्यार्थी स्थलांतरीत झाले. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील आमच्या शाळेत कोणतीच पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. कामगिरी शिक्षक यादीतील आमच्या शाळेतील नाव देखील वगळ्यात आलेले होते, असेही ते म्हणाले.

केंद्रशाळा मसुरे न. १ शाळेचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पळसंब शाळेचे मुख्याध्यापक विनोद कदम यांना मसुरे शाळा येथे नियुक्त करणे हे पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने विनोद कदम यांना केंद्रशाळा मसुरे न. १ या शाळेत नियुक्त करण्याचा जो आदेश दिला आहे. तो तात्काळ रद्द करण्यात यावा व विनोद कदम यांना पळसंब शाळा येथे पाठविण्यात यावे अन्यथा आम्ही पंचायत समिती कार्यालय सोडणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. याबाबत गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर व गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

You cannot copy content of this page